Join us

दिल्लीतील दंगलीस केंद्रातील सरकारच जबाबदार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:21 IST

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय मेळाव्यात बोलताना खा. पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई : दिल्लीतील दंगलीस शंभर टक्के केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारच जबाबदार असून ही दंगल रोखण्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पूर्णत: अपयश आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली.रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय मेळाव्यात बोलताना खा. पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दिल्ली विधानसभेत सत्ता हाती येत नाही याची जाणीव झाल्यानंतर भाजपकडून धार्मिक विद्वेषाचे राजकारण करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह भाजप मंत्र्यांची विधाने देशाच्या सामाजिक, धार्मिक ऐक्याला छेद देणारी होती. देशाच्या राजधानीला आग लागलेली असताना ती विझविण्यासाठी प्रयत्न करण्याऐेवजी गोळी मारण्याची भाषा केली गेली. भक्तांच्या मदतीने शैक्षणिक वास्तूही उद्ध्वस्त केल्या गेल्या. अमेरिकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर असतानाच एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्यात आले, अशी टीका पवार यांनी केली.>आघाडी सरकार पाच वर्षे टिकेलराज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकेल की नाही, अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जात आहे. मात्र, आम्ही सारे सत्तेसाठी नाही तर राज्याच्या भल्यासाठी एकत्र आलो असून हे सरकार पाच वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण करेल यात शंका नाही, अशा विश्वास खा. शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपने शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :शरद पवारदिल्लीनागरिकत्व सुधारणा विधेयक