Join us

Sharad Pawar: "असं बोलणं हा तर त्यांचा अपमानच..."; शरद पवारांनी मांडलं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 21:51 IST

"त्या लोकांबद्दलचं ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते"

Sharad Pawar: आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि जंगली इथे ते खरे मालक आहेत, असे रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११०व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.

"हल्ली बऱ्याच लोकांचे आदिवासींसंबंधीचे ज्ञान हे एकादृष्टीने अज्ञानच आहे अशाप्रकारची प्रचिती येते. आजही या देशातील, राज्यातील वनसंपत्ती आदिवासींनी सांभाळलेली आहे. हा खरा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी, त्यांचे अधिकार जतन करण्यासाठी अजूनही लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात याचे मला समाधान आहे," असेही ते म्हणाले.

"आदिवासींच्या हिताची जपणूक करण्यासाठी विशेष लक्ष देऊन काम करण्याची आवश्यकता आहे. हे ध्यानात घेऊन आज ती जबाबदारी सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मध्यंतरी वर्धा येथील सेवाग्राममध्ये आदिवासींमध्ये काम करणारे आदिवासी गावाचे गावप्रमुख यांचे एक संमेलन घेतले होते. शेकडो लोक व भगिनी होत्या. आपल्या गावाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कष्ट करायला कुठलीही कमतरता नाही या गोष्टी पदोपदी त्या सांगत होत्या. आणि त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या पाठीशी ही सगळी शक्ती उभी आहे. त्यांच्या पाठीशी चव्हाणसेंटर उभे राहिल आणि उपेक्षित माणसाला साथ देईल," अशी खात्री शरद पवार यांनी यावेळी दिली.

"आजचा दिवस यशवंतराव चव्हाणचा ११० वा जन्मदिवस साजरा करण्याचा महोत्सव आहे. गेले अनेक वर्षे त्यांच्याशी संबंधित असणारे दिवसाचे कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरे करत आहोत. उभं आयुष्य त्यांनी देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी दिले. सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानवयात पितृत्व गमावले आणि मातेच्या छत्रछायेखालील मार्गदर्शनाखाली ज्यांची उभारणी झाली असे हे चव्हाणसाहेब... त्यांची सगळी पार्श्वभूमी बघितल्यानंतर महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबात एखादी व्यक्ती जन्माला आली आणि कठीण परिस्थितीत कष्ट करण्याचा प्रयत्न करते याचे उत्तम उदाहरण ते स्वत: आहेत," असेही शरद पवार म्हणाले.

अझीम प्रेमजी यांचा सन्मान

सन २०२२ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी असणारे दानशूर, परोपकारी अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :शरद पवारमुंबई