Join us  

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 9:15 AM

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. 

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची एक खास मुलाखत घेतली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, इथून पुढे प्रत्येक नागरिकाला तुम्हाला आणि मला कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. त्यामुळे कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. 

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉर्मलवरती येईल, पण याचा अर्थ तो कायमचाच संपला असा घेण्याचं कारण नाही. तो रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या काळात आपल्याला कोरोनाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवारांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview) अशा परिस्थितीत लॉकडाऊन करावं लागतं. पण लॉकडाऊनचेही परिणाम उद्योगधंदे आणि इतर गोष्टींवर झाले आहेत. इथून पुढे आपल्या पाठ्यपुस्तकातील जो काही अभ्यासक्रम आहे, त्याच्यामध्ये हा सगळा कालखंड जो काही आपण गेल्या दोन महिन्यांपासून अनुभवला आहे. या संबंधीच्या ज्या काही काळजी घेण्याची किंवा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. यावर आधारित एखाददुसरा धडा पाठ्यपुस्तकात असणं आवश्यक आहे, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.  (Sharad Pawar Sanjay Raut Interview)शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून (आजपासून) पाहायला मिळत आहे. तीन भागांमधील ही मुलाखत पाहायला मिळणार आहे. गेली ५५ वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहिलं आहे. शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पवारांच्या पुढाकारानंच हे सरकार स्थापन झालं असून, उद्धव ठाकरेही पवारांशी सल्लामसलत करून सरकार चालवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सरकारमधील अनेक विषयांवरही मत व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :शरद पवारसंजय राऊत