Join us  

शरद पवारांनी सांगितलं ते 'अर्धसत्य', मोदी भेटीबाबत फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:27 AM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षावर आपलं मत मांडलं, तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं

मुंबई - राज्यात महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षातून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. या सत्तेच गणित राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जुळवून दाखवलं. मात्र, राष्ट्रवादीला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ऑफर दिली होती, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षावर आपलं मत मांडलं, तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले. मात्र, अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले होते. त्यावरुनही फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यातच, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आम्हाला ऑफर होती, पण मी विनम्रपणे नाकारली, असे पवारांनी म्हटले होते. याबाबत फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. 

शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नरेद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील चर्चेला केवळ त्या दोनच व्यक्ती उपस्थित होत्या. या भेटीबद्दल शरद पवार यांनी त्यांची बाजू मांडली आहे. मात्र, त्यांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे, या भेटीचा पूर्ण तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीत नेमकं काय झालं? याबद्दल मला काही प्रमाणात माहिती आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुसरी बाजू हे ते स्वत:च सांगतील किंवा ते ज्या व्यक्तीला अधिकार देतील, तीच व्यक्ती याबाबत बोलेन. मी या भेटीचा तपशील सांगू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले. 

दरम्यान, लोकसभेत सोबत लढलो आणि विधानसभेसाठी वेगळे झालो, हे योग्य वाटणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकही शिवसेनेत सोबत लढा असा संदेश आम्हाला दिल्लीतून आला होता. त्यानुसार आम्ही एकत्र निवडणूक लढवली आणि जनतेनंदेखील आम्हाला कौल दिला. मात्र, शिवसेनेनं जनादेशाचा विश्वासघात केला, असं टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडलं.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारनरेंद्र मोदी