Join us  

फडणवीसांच्या सोयीसाठी तपास एनआयएकडे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:32 AM

एल्गार, कोरेगाव-भीमाचा संबंध नाही

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊ न टीका केली. ते म्हणाले, पुण्यातल्या एल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव घटनेचा संबंध नव्हता. मात्र दिवस एकच होता. सरकार विरोधी साहित्यिकांचा या परिषदेत सहभाग होता. त्यांनी आपली नाराजी काव्य किंवा लिखाणातून मांडली.

पवार म्हणाले की, सरकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावून ज्यांचा संबंध नाही अशा लोकांवर केवळ लिखाण केले, म्हणून देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे योग्य नाही, त्याची चौकशी झाली पाहिजे, असे आपले मत आहे. राज्यघटनेने कायदा व सुव्यवस्थेचा अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्यात घडलेल्या गोष्टींची सरकार चौकशी करत असते.ते सबंध प्रकरण एनआयएकडे देणे याचा अर्थ त्यांना काही गोष्टी झाकायच्या किंवा लपवायच्या आहेत. कारण हे प्रकरण झाले, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या कालखंडात ज्या गोष्टी घडल्या त्याची चौकशी झाली तर यातले सत्य बाहेर येईल. जे कदाचित त्यावेळच्या लोकांना सोयीचे नसावे म्हणून केंद्र सरकारने त्यांच्या मदतीसाठी हे सगळे चौकशी प्रकरण काढून घेतले आणि आपल्या मते हे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीसकोरेगाव-भीमा हिंसाचार