Join us  

Sharad Pawar: राष्ट्रवादीचं दिल्लीत संमेलन, धर्म अन् जातीभेदाविरोधातील राजकारणाला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 1:40 PM

महाराष्ट्रात मनसेनं मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता

मुंबई - राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण करणारं वातावरण तयार करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. जय श्रीराम, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्याच्या विषयावरुन वाद निर्माण केले जात आहेत. राज्यात आणि देशातील हे वातावरण सामाजिक सलोखा आणि ऐक्य बिघडवून टाकणारे आहे. त्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राजधानी दिल्लीत राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासंदर्भात स्वत: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रात मनसेनं मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तर, दिल्ली अन् उत्तर प्रदेशातील काही भागात श्रीराम मिरवणुकीवरुन धार्मिक तेढ निर्माण झाले होते. एकंदरीत सोशल मीडियातूनही अनकेदा काही गट-तट धार्मिक भावना भडकवणारे विधान करतात. त्यासंदर्भातील व्हिडिओही शेअर केले जातात. त्यामुळे, देशातील, राज्यातील, गावांतील गुण्या-गोविंदाने नांदणाऱ्या सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो. त्यासाठी, राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय युवक कार्यकर्त्यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी, देशातील राजकीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यात येत असलेल्या वातावरणावर चर्चा केली. तसेच, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होत असलेल्या अशा नाजूक समयी युवकांमध्ये जनजागृती करण्याचा उप्रकम राष्ट्रवादीने हाती घेतला आहे. राजधानी दिल्ली येथे हे संमेलन होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निवेदन, निमंत्रण शरद पवार यांना युवक राष्ट्रवादीतर्फे देण्यात आले. तर, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाला विरोध करण्यासाठी मी हे निमंत्रण स्विकार केल्याचंही शरद पवार यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. 

दरम्यान, यावेळी शरद पवार यांना निवेदन पत्रिका देण्यात आली आहे. त्यामध्ये, युवा अधिकार कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी हे निवदेन.. असा विषय लिहिला आहे.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसदिल्लीदिल्ली कॅपिटल्ससमाज