Join us  

शरद पवारांना विकेट घ्यायलाच आवडतं, पण सदुभाऊंनी त्यांचीच विकेट घेतली 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:58 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मुंबई - देशाच्या राजकारणातील अष्टपैलू खेळाडू असलेले शरद पवार कधी कुणाची विकेट घेतील सांगता येत नाही. त्यामुळेच, कुस्तीगीर त्यांना तेल लावलेला पैलवान म्हणतात. तर क्रिकेटर्स त्यांना अष्टपैलू खेळाडू म्हणतात. सोमवारी तळजाई ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी तळजाई टेकडीवर बांधलेल्या सदुभाऊ शिंदे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, उद्घाटन करता पवारांनी फलंदाजीऐवजी गोलंदाजी स्विकारत आपल्याला विकेट घ्यायलाच आवडतं हे दाखवून दिलं 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदुभाऊं शिंदेंनी कशी माझी विकेट घेतली, याचा किस्सा पवारांनी सांगितला. तसेच देशाच्या क्रिकेटमध्ये होत असलेल्या बदलांवरही यावेळी त्यांनी भाष्य केलं. सदुभाऊ शिंदे हे उत्तम फिरकीपटू होते व सदुभाऊ गुगलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गुगली टाकून माझी विकेट घेतली व मी त्यांचा जावई झालो, असे पवारांनी म्हटले. पवारांच्या या गुगलीवर प्रेक्षकांतून एकच हशा पिकला. सदू शिंदे हे शरद पवार यांचे सासरे असल्याने पवार व शिंदे कुटुंबातील लहान-मोठे असे तब्बल 32 जण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले; मात्र, त्या आल्या नाहीत. पवार यांनीही त्यांना आग्रह करू नका, असे संयोजकांना सांगितले.

राजकीय टीकाटिप्पणी करत पवार यांनी यावेळी जुन्या क्रिकेटपटूंची नावासह माहिती देत त्यांच्या क्रिक्रेटप्रेमाचे दर्शनही घडवले. महापालिकेला काही सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. तसेच पृथ्वीराज चव्हाण आणि मी दोघांनाही हातात हात घालून काम करावे लागणार आहे, असे म्हणत आगामी निवडणुकांसाठी आघाडीचे स्पष्ट संकेतही दिले. 

शरद पवारांनी केली बॉलिंगतळजाई येथील सदू शिंदे क्रिक्रेटच्या मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी पवारांना फलंदाजी करत उद्घाटन करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, पवार यांनी गोलंदाजी स्विकारत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 2 चेंडू टाकले. विशेष म्हणजे पवारांच्या दोनपैकी एकही चेंडू अशोक चव्हाणांना टोलवता आला नाही. 

 

टॅग्स :शरद पवारपुणे