Join us  

सरकारविरुद्ध टोकाची भूमिका घ्या, पण शेतमालाची नासाडी नको- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 1:16 PM

कुठल्याही मार्गाने निवडणुका जिंकणे, हाच सरकारचा मानस आहे.

मुंबई: सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी संपाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, त्याचवेळी आंदोलक शेतकऱ्यांनी शेतमालाची नासाडी करू, नये अशी विनंतीही त्यांनी केली. एक शेतकरी म्हणून माझा शेतकरी संपाला पाठिंबा आहे. समाजाने शेतकरी संपाला पाठिंबा द्यावा. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. तशी त्यांची नियत दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घ्यावी, असे पवारांनी म्हटले. हे आंदोलन करताना शेतकऱ्यांनी सामान्य माणसाला त्रास होईल, लोकांवर आघात होईल, असे काही करु नये. तसेच आंदोलनात रस्त्यावर दूध ओतणं टाळावे. आक्रोश दाखवायचा असेल तर दूध गरीब मोहल्ल्यात वाटप करा. त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही. त्याउलट गरिबांची सहानभूती मिळेल, असा सल्ला पवार यांनी शेतकऱ्यांनी दिला.याशिवाय, पवार यांनी भाजपा सरकारवरही टीका केली. कुठल्याही मार्गाने निवडणुका जिंकणे, हाच सरकारचा मानस आहे. पालघरमध्ये भाजपाला विजय मिळाला असला तरी जनता भाजपाच्या बाजूने नाही. त्यासाठी सरकारकडून साम, दाम, दंड, भेद असे सर्व मार्ग अवलंबिले जातात. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी लोकमानस जाणून घेण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.  असे घडले तर सगळ्यांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला आनंद होईल, असे सूचक विधान पवारांनी यावेळी केले.  

टॅग्स :शेतकरी संपशरद पवारशेतकरी