Join us  

...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 9:00 AM

पण अशानं दोन्ही देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात हे आता आपल्या लक्षात आलं असेल, असाही टोला पवारांनी मोदींना लगावला आहे.

मुंबई – चीन आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे. त्यांचं टार्गेट आता भारत आहे. म्हणजे मोदी साहेबांनी तिथे जाऊन त्यांच्याशी दोस्ती केली. त्यांना इथे आणून झोपाळ्यावर बसवलं आणि भारतीय कपडे शिवले. हे सगळं करून आपण खूप मोठं काही तरी घडवून आणलंय, असं चित्र निर्माण केलं, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, एकमेकांच्या हातात हात घालून, गळाभेट करून दोन्ही देशांची दोस्ती होतेय, असं चित्र निर्माण केलं गेलं. पण गळाभेट ठीक आहे, शेकहँड ठीक आहे, पण अशानं दोन्ही देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात हे आता आपल्या लक्षात आलं असेल, असाही टोला पवारांनी मोदींना लगावला आहे.  (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) 

नरेंद्र मोदी हे बारामतीत आले असताना शरद पवार हे माझे गुरु आहे असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन राजकारणात कोणी कोणाचाच गुरु नसतो, फक्त सोय पाहिली जाते असा टोला पवारांनी लगावला आहे. याबाबत शरद पवार म्हणाले की, मी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) गुरु आहे असं सांगून त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच अर्थव्यवस्थेसंबंधीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, दुर्दैवाने काय झालं मला माहिती नाही. ते सोडून गेले, आता जी माणसं आहेत ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका डॉ. मनमोहन सिंग (Dr.Manmohan Singh) यांची गरज आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केले.

टॅग्स :शरद पवारनरेंद्र मोदी