Join us

शांतिदूत जन कल्याण पार्टी पालिका निवडणूक लढणार, कबुतरच निवडणूक चिन्ह, जैन मुनींनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 10:42 IST

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे मृत झालेल्या कबुतरांसाठी दादरच्या योगी सभागृहात जैनमुनींनी शांतीसभेचे आयोजन केले होते.

मुंबई : कांद्यामुळे जसे काँग्रेस सरकार गेले तसेच कबुतरांमुळे महायुतीचे सरकार जाईल, असा इशारा देतानाच कबुतरांसह इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी शांतीदूत जनकल्याण पक्ष स्थापन करत आहे. प्रत्येक वॉर्डात कबुतर चिन्ह घेऊन आमचे उमेदवार पालिका निवडणूक लढवतील, अशी घोषणा जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.

मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयामुळे मृत झालेल्या कबुतरांसाठी दादरच्या योगी सभागृहात जैनमुनींनी शांतीसभेचे आयोजन केले होते. या सभेनंतर पत्रपरिषदेत मुनी विजय यांनी, मुंबईतील जैन समाज सर्व समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला; पण, आमच्या मुद्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नसल्यामुळेच राजकीय पक्ष स्थापन करावा लागत असल्याचे स्पष्ट केले.

कबुतरांमुळे आजार होत असल्याचा पुरावा समोर आला नसतानाही पालिका प्राण्यांवर अन्याय करत आहे. इतकी वर्षे कबुतरखाना सुरू असताना कधी प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, तिथे कुणाला तरी डेव्हलपमेंट करायची असल्यामुळे हा मुद्दा समोर आणण्यात आला. नवीन ठिकाणी कबुतरखाना हलविण्यासाठी हा काही एसआरए प्रोजेक्ट आहे का? याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

माणसाने घरे बांधली म्हणून कबुतरे बेघर! कबुतरे, कुत्रे, गायी सुरक्षित नाही. गणपतीचे वाहन उंदरावरही याल. विकासाच्या नावाखाली झाडे तोडून माणसांनी घरे बांधली म्हणून कबुतरे बेघर झाली. आम्ही गोमातेसह इतर प्राण्यांसाठीही काम करू. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाही. मात्र, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी कबुतरांचा प्रश्न निर्माण केला. आमचा धर्म आम्ही विसरणार नाही, असेही मुनी विजय म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shantidoot Jan Kalyan Party to Contest Election with Pigeon Symbol

Web Summary : Jain Muni Nileshchandra Vijay announced the Shantidoot Jan Kalyan Party will contest municipal elections with the pigeon symbol. He criticized the closure of pigeon houses and pledged to protect animals, accusing authorities of prioritizing development over animal welfare and warning of political consequences.
टॅग्स :कबुतरराजकारण