शांताराम यांचे कार्य थक्क करणारे

By Admin | Updated: December 21, 2015 00:42 IST2015-12-21T00:23:14+5:302015-12-21T00:42:35+5:30

दिलीप प्रभावळकर : मान्यवरांच्या हस्ते मराठी चित्रपट सूचीचे प्रकाशन

Shantaram's work was shocking | शांताराम यांचे कार्य थक्क करणारे

शांताराम यांचे कार्य थक्क करणारे

कोल्हापूर : वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून चित्रपट दिग्दर्शनात उतरलेल्या व्ही. शांताराम यांनी आपल्या आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपटाचाच विचार करीत होते. त्यांना ‘महाभारत’ या पौराणिक ग्रंथावर ‘उत्तर महाभारत’ मालिका काढायची होती; पण ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही. भारतीय चित्रपट जगतात शांताराम यांचे कार्य थक्क करणारे आहे. ‘शांतारामा’ हे आत्मचरित्र मधुरा जसराज यांच्या पाठपुराव्यामुळेच साकारले. हे पुस्तक वाचताना शांतारामबापू स्वत:च बोलत आहेत असे वाटते, असे प्रतिपादन अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी रविवारी येथे केले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील खुला मंच या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिग्दर्शक किरण शांताराम, लेखक कृष्णात खोत, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.
१९१३ ते २०१४ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची सूची व्ही. शांताराम फौंडेशनने तयार केली आहे. कृष्णात खोत यांच्या हस्ते व्ही. शांताराम फौंडेशनच्या मराठी चित्रपट सूचीचे प्रकाशन करण्यात आले. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘शांतारामा’ या आॅडियो सीडीला दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत करण्यात आले आहे. यामधील प्रस्तावना व अखेरच्या भागाचे दिलीप प्रभावळकर यांनी सादरीकरण केले.
किरण शांताराम म्हणाले, कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांनी ‘कलापूर’ बनविले. अनेक मराठी चित्रपटांचे निर्मिती कें द्र हे कोल्हापूरच राहिलेले आहे. शाहू महाराजांनी कलेला राजाश्रय दिला. कोल्हापूरचे आणि माझे घनिष्ट असे नाते आहे. बाबूराव पेंटर हे माझ्या गुरूंचे गुरू आहेत. यंदाचे वर्ष कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. या निमित्ताने कलामहर्षी बाबूराव पेंटर यांना अभिवादित या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल.
कृष्णात खोत म्हणाले, जगभरातले दिग्दर्शक आपल्याला भावलेल्या गोष्टी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. समकालीन राजकीय परिस्थितीवर धाडसाने भाष्य करत असतात पण आपल्या चित्रपटात हे दिसत नाही. आपला चित्रपट राजकारणावर भाष्य करायला अजूनही धजत नाही. अज्ञात गोष्टी शोधण्याचे चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. अज्ञात गोष्टी शोधणारे शास्त्र, संस्कृती शोधते. अशा जगभरातल्या संस्कृतीचा मेळ साधण्याचे काम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून होते.
चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shantaram's work was shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.