Join us

शक्ती मिल प्रकरण : ‘बलात्कार पीडितांबाबत दृष्टिकोन कालबाह्य’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 05:00 IST

बलात्कार पीडितांकडे बघण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन कालबाह्य असून घटनात्मक अधिकारांशी विसंगत आहे, असा युक्तिवाद शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला.

मुंबई : बलात्कार पीडितांकडे बघण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन कालबाह्य असून घटनात्मक अधिकारांशी विसंगत आहे, असा युक्तिवाद शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला.हत्येपेक्षाही बलात्कार हा भयंकर गुन्हा आहे, असा युक्तिवाद गेल्या सुनावणी महाअधिवक्त्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना आरोपींचे वकील युग चौधरी यांनी वरील युक्तिवाद केला.‘महिलेचा अशा प्रकारे अपमान (बलात्कार) करणे हे हत्येपेक्षाही भयंकर आहे, हा सरकारचा दृष्टिकोन कालबाह्य आहे. समान वागणूक आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे,’ असा युक्तिवाद चौधरी यांनी केला. नवी दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने सीआरपीसी कलम ३७६ मध्ये केलेल्या सुधारणेवर चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला. जनक्षोभामुळे संसद कायद्यात बदल करणार का? लोकांच्या इच्छेनुसार कायद्यात बदल केले जाणार का? असे प्रश्न चौधरी यांनी केले. न्यायालयाने सर्वांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकांवरील निर्णय राखून ठेवला आहे. मोहम्मद कासीम बंगाली, मोहम्मद सलीम अन्सारी आणि विजय जाधव यांनी सीआरपीसीचे सुधारित कलम ३७६ (ई)च्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.