Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद कपूरवर लैंगिक छळाचा गुन्हा; रीलस्टार तरुणीची तक्रार, घरी बोलावले आणि आक्षेपार्ह वर्तन केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 07:38 IST

दिवशी संध्याकाळी ती संबंधित पत्त्यावर पोहोचली. ते कपूर यांचे घर आहे, कार्यालय नाही, हे तिथे पोहोचल्यावर तिच्या लक्षात आले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.  

मुंबई : गोरेगाव येथील एका रीलस्टार तरुणीच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी अभिनेता शरद कपूरवर बुधवारी रात्री लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. जोश, लक्ष्य, दस्तक, आदी चित्रपटांतील भूमिकांमुळे परिचित असलेल्या कपूर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. 

तक्रारदार तरुणीचे एक प्रॉडक्शन हाऊस असून, ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर रील्स प्रसारित करते. गेल्या तीन महिन्यांपासून तिला अभिनेता शरद कपूर या फेसबुक यूजरकडून मेसेज येत होते. सुरुवातीला तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु अनेक मेसेजेस आल्यानंतर तिने त्याची ओळख पटावी म्हणून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. २६ नोव्हेंबरला तिला कपूरचा व्हिडीओ कॉल आला. त्यात त्याने तिला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहिल्याचे आणि तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तुझ्याशी शूटिंगशी संबंधित कामावर चर्चा करायची आहे असे सांगत त्याने तिला आपल्या कार्यालयात येण्याची विनंती केली आणि आपला मोबाइल नंबर, गुगल लोकेशन आणि पत्ता शेअर केला. त्याच दिवशी संध्याकाळी ती संबंधित पत्त्यावर पोहोचली. ते कपूर यांचे घर आहे, कार्यालय नाही, हे तिथे पोहोचल्यावर तिच्या लक्षात आले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.  

पोलिसांनी अभिनेत्यावर बीएनएस कायद्याचे कलम ७४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), ७५ (लैंगिक छळ) आणि ७९ (महिलेचा अपमान करण्याच्या हेतूने शब्द, हावभाव किंवा कृती करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

काय घडले?

तक्रारदार तरुणी अभिनेत्याच्या घरी पोहोचली तेव्हा घराचा दरवाजा एका वृद्ध महिलेने उघडला. तिने घरात प्रवेश केल्यावर अभिनेत्याने तिला त्याच्या बेडरूमध्ये बोलावून घेतले. ती त्याच्या बेडरूमच्या दारात गेली तेव्हा तो विवस्त्रावस्थेत होता. त्या अवस्थेत त्याने आपल्याला जवळ बोलावून आक्षेपार्ह वर्तन केले.

तसेच संध्याकाळी तिला व्हॉट्सॲपवर एक फोटो आणि अश्लील आशयाची लिंक आणि सोबत एक व्हॉईस नोटही पाठवली. व्हॉईस नोटमध्ये आपल्याला असभ्य भाषा वापरली, असे तक्रारीत म्हटले आहे.

आरोप खोटे : शरद कपूर

मी न्यूयॉर्कमध्ये आहे. कथित घटनेच्या वेळीही मी तेथे नव्हतो. मी कधीही असे चुकीचे काम केले नाही आणि मी या महिलेला एकदाही भेटलो आहे, असा दावा शरद कपूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. तसेच त्यांनी लैंगिक छळाचा आरोपही फेटाळला आहे.

पोलिस म्हणतात...

या गुन्ह्यात अद्याप संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आम्ही त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगणारी नोटीस पाठवली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.