मलनि:सारण प्रकल्प : सांडपाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:14+5:302021-02-05T04:34:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये अनुक्रमे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, ...

Sewage Project: Sewage will be used for purposes other than drinking | मलनि:सारण प्रकल्प : सांडपाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणार

मलनि:सारण प्रकल्प : सांडपाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये अनुक्रमे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के सांडपाण्यावर तृतीय स्तरावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करण्यात येणार आहे. सर्व सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी १ हजार ३४६.४४ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

कुलाबा येथील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील तृतीय स्तरावर प्रक्रिया केलेले १० दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके पाणी उपलब्ध झाले आहे. त्यापैकी ३ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतके प्रक्रिया केलेले पाणी कुलाबा परिसरातील नौदल कार्यालयाच्या मागणीनुसार पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी देण्याचे प्रस्तावित आहे.

..................

मुंबई मलनि:सारण प्रकल्पांतर्गत १ हजार ९५५.८६ कोटी

मिठी नदी अंतर्गत कुर्ला ते धारावीपर्यंतच्या मलजल प्रक्रिया केंद्रांपर्यंत मलजल बोगदा उभारण्याच्या कामाची निविदा मागविण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च ५४४.७६ कोटी आहे.

बोरिवली ते मालाडपर्यंत मलजल बोगदा आणि गोरेगाव उदंचन केंद्र ते मालाड मलजल बोगद्याकरिता ६० कोटींची तरतूद आहे.

नवीन वर्सोवा आंतरप्रवाही उदंचन केंद्र : २९३ कोटी

वर्सोवा मलजल बोगदा : १५०.९५ कोटी

एस. व्ही. रोड मलजल बोगदा : ३३५ कोटी

मिठी नदी मलजल प्रक्रिया केंद्र : १४६ कोटी

मालाड आंतरप्रवाही उदंचन केंद्र : ६७० कोटी

भायखळा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम मे २०२१मध्ये पूर्ण होईल. या सर्व कामांसाठी ४४१.५० कोटींची तरतूद आहे.

..................

मलजल वाहिन्यांची सफाई करताना मानवी संपर्क कमी करण्यासाठी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे. या अंतर्गत मलनि:सारण प्रचालन खात्यांतर्गत १६८.७६ कोटींची तरतूद आहे.

मुंबई मलनि:सारण सुधारणा कार्यक्रमांतर्गत रस्त्यांवर ९३.६८ किलोमीटर लांबीच्या मलजल वाहिन्या टाकण्यासह त्याचे आकारमान वाढविण्याचे काम नियोजित आहे. त्यानुसार २७५.३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Sewage Project: Sewage will be used for purposes other than drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.