लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या मलजल वाहिन्यातील सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेने ७ एसटीपी अर्थात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे स्थापन केली असून, ही सर्व केंद्रे टप्प्याटप्प्याने २०२६ ते २०२८ या दरम्यान पूर्णपणे कार्यन्वित होतील, अशी माहिती आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील विविध प्रदूषणावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यासंदर्भातील तपशीलवार माहिती मागितल्यानंतर पालिकेकडून त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.
मुंबईची पाण्याची दररोजची गरज ४५०० दशलक्ष लिटर असून, उपलब्ध पाणीपुरवठा हा ३,८३० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे अंदाजे ६७० दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. भविष्यात ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी २४६४ दशलक्ष लिटर म्हणजे ८० ते ९० टक्के भाग सांडपाण्याच्या रूपाने समुद्रात सोडला जातो. या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते वाचविण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जाणार आहे. त्यादृष्टीने सध्या वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप, वर्सोवा अशा ७ ठिकाणी एसटीपी केंद्रे कार्यरत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यातून दररोज २४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर तृतीय स्तरावरील प्रक्रिया करून ५० टक्के म्हणजे, १२३२ दशलक्ष लिटर पाणी वापरण्यायोग्य करण्याची पालिकेची योजना आहे.
असे होणार काम
- सातही एसटीपी प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असून, नियोजित वेळेपूर्वी ते पूर्ण होईल.
- त्यापैकी धारावी प्रकल्पातून ४१८ एमएलडी, वरळी प्रकल्पातून ५०० एमएलडी, वांद्रे येथून ३६० एमएलडी, वर्सोवा प्रकल्पातून १८० एमएलडी, मालाडमधून ४५४ एमएलडी, घाटकोपर प्रकल्पातून ३३७ एमएलडी आणि भांडुप एसटीपी प्रकल्पातून २१५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाणार आहे.
एसटीपी केंद्राचे शुद्ध पाणी उद्योगांना विकणार
- या प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी विविध आस्थापनांना त्यांच्या व्यावसायिक वापरासाठी पालिकेकडून विकण्यात येणार आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी त्याचा व्यावसायिक वापर होऊ शकतो.
- त्यामुळे याचा वापर महसूल वाढीसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसी, पोर्ट ट्रस्ट, बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पॉवर, आरसीएफ यांच्याशी बोलणी सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रकल्प नियोजित वेळ
- वर्सोवा जुलै २०२६
- घाटकोपर जुलै २०२६
- भांडुप ऑगस्ट २०२६
- वांद्रे जुलै २०२७
- वरळी जुलै २०२७
- धारावी जुलै २०२७
- मालाड जुलै २०२८