लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असला, तरी ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या बाबतीत मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाचे चित्र समोर येत आहे. पुनर्विकासासाठी सर्वप्रथम पुढाकार घेणाऱ्या या रहिवाशांना गेली सात वर्षे संक्रमण शिबिरातच राहावे लागत असून, अद्याप त्यांना नव्या घरांचा ताबा मिळालेला नाही.
पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी सकारात्मक भूमिका घेत आपली घरे रिकामी केली होती. मात्र त्यानंतर वरळी आणि नायगाव येथील रहिवाशांना घरे मिळाली असताना, सर्वात आधी सहकार्य करणाऱ्यांनाच प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या हे रहिवासी अत्यंत कठीण परिस्थितीत संक्रमण शिबिरात राहत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, तरीही सर्वात आधी सहकार्य करणाऱ्यांनाच प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजीचा सूर प्रशासनाकडून घर मिळण्याची आशा त्यांनी कायम ठेवली आहे. मात्र वारंवार आश्वासने आणि तारखा दिल्या जात असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती होत नसल्याचा आरोप रहिवाशांचा आहे.
पुनर्विकास कामाची गती मंदावण्यामागे नियोजनाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे. अधिकाऱ्यांकडून बैठका घेतल्या जात असल्या तरी प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणीसाठी वेळ दिला जात नसल्याने कामाला गती मिळत नसल्याचे सांगितले जाते.
'आम्हाला लवकरात लवकर घरे द्या'
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 'एकास एक पाकिंग' ही मागणीही मांडण्यात आली होती, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अपेक्षित पुढाकार घेतलेला नसल्याची टीका होत आहे. एकूणच, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत शासन आणि प्रशासन गंभीर नसल्याची भावना हजारो रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे. लवकरात लवकर हक्काची घरे मिळावीत आणि पुनर्विकासाचे काम गतीने पूर्ण व्हावे, अशी मागणी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केली आहे.
Web Summary : Na. M. Joshi Marg BDD chawl residents, early supporters of redevelopment, still await homes after seven years in transit camps. Despite promises, progress is slow, causing frustration. Residents cite poor planning and lack of official oversight. They appeal for swift action from authorities.
Web Summary : ना. एम. जोशी मार्ग बीडीडी चॉल के निवासी, जो पुनर्विकास के शुरुआती समर्थक थे, सात साल बाद भी ट्रांजिट कैंपों में घरों का इंतजार कर रहे हैं। वादों के बावजूद, प्रगति धीमी है, जिससे निराशा है। निवासियों ने खराब योजना और आधिकारिक निरीक्षण की कमी का हवाला दिया। वे अधिकारियों से त्वरित कार्रवाई की अपील करते हैं।