सात महिन्यांत म.रे.ची १,३२७ कोटींची कमाई
By Admin | Updated: November 17, 2015 03:16 IST2015-11-17T03:16:32+5:302015-11-17T03:16:32+5:30
मध्य रेल्वे प्रवासी उत्पन्नाच्या उद्दिष्टापासून फार दूर असल्याचे समोर आले आहे. मुंबई उपनगरीय लोकल सेवा तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित आणि अनारक्षित सेवांमधून

सात महिन्यांत म.रे.ची १,३२७ कोटींची कमाई
मुंबई : मध्य रेल्वे प्रवासी उत्पन्नाच्या उद्दिष्टापासून फार दूर असल्याचे समोर आले आहे. मुंबई उपनगरीय लोकल सेवा तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित आणि अनारक्षित सेवांमधून सात महिन्यांत १,३२७ कोटींचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. मध्य रेल्वेकडून उत्पन्नासाठी १,५२४ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात उपनगरीय लोकल सेवेतून मिळणाऱ्या प्रवासी उत्पन्नापासूनही अजून दूर असल्याचे सांगण्यात आले.
मध्य रेल्वे ही मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाच विभागांमध्ये विभागली गेली आहे. मध्य रेल्वेवरून लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच लोकल सेवाही सुरू आहेत. यात मुंबईतील उपनगरीय लोकलच्या मेन लाइनचा पसारा हा सीएसटीपासून कर्जत, कसारा, खोपोली तर हार्बरचा वाशी, पनवेल आणि अंधेरीपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज ४२ ते ४५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मोठ्या प्रमाणात प्रवास करणारे प्रवासी आणि तिकिटांची होणारी विक्री, विनातिकीट प्रवासी इत्यादीतून प्रवासी उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेकडून ठरविण्यात येते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न जरी केले जात असले तरी २0१४मध्ये प्रवासी उत्पन्नाच्या उद्दिष्टापासून मध्य रेल्वे वंचितच राहिली आहे.
१ हजार ५२४ कोटी ११ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले असतानाच २0१४-१५मध्ये उपनगरीय लोकल सेवा तसेच आरक्षित आणि अनारक्षित सेवांमधून १ हजार २६१ कोटी ४६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये उपनगरीय लोकल सेवेतून उत्पन्नाचे उद्दिष्ट हे ४५४ कोटी ३३ लाख ठरविण्यात आलेले असतानाही फक्त ४0९ कोटी ५९ लाखांचे उत्पन्नच मिळाल्याचे सांगण्यात आले.
२0१५-१६मध्येही मध्य रेल्वेकडून तेवढेच उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. परंतु त्यापासून अजूनही मध्य रेल्वे दूरच आहे. एप्रिल ते आॅक्टोबरपर्यंत १ हजार ३२७ कोटी ७५ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, यामध्ये ३९८ कोटी ८0 लाखांचे उत्पन्न हे उपनगरीय लोकल सेवेचे आहे. उपनगरीय लोकल सेवेचेही ४५४ कोटी ३३ लाख रुपये उद्दिष्ट आहे.