सात फटाके ध्वनिप्रदूषण पातळीच्या मर्यादेत
By Admin | Updated: October 9, 2014 23:56 IST2014-10-09T23:56:36+5:302014-10-09T23:56:36+5:30
फटाक्यांच्या कर्कश:तेच्या तपासणीमध्ये ९ फटाक्यांपैकी ७ फटाके हे निर्धारित ध्वनीप्रदूषण पातळीच्या मर्यादेत असल्याचे आढळून आले आहे

सात फटाके ध्वनिप्रदूषण पातळीच्या मर्यादेत
स्नेहा पावसकर, ठाणे
फटाक्यांच्या कर्कश:तेच्या तपासणीमध्ये ९ फटाक्यांपैकी ७ फटाके हे निर्धारित ध्वनीप्रदूषण पातळीच्या मर्यादेत असल्याचे आढळून आले आहे.तर दोन फटाक्यांचा धडाका हा मर्यादेपेक्षा अधिक होता. त्यामुळे सर्वेक्षणानुसार फटाक्यांच्या परिक्षेत ७ फटाके पास तर २ फटाके नापास झाले आहेत.
यंदा प्रथमच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या विभागनिहाय मोहिमे अंतर्गत ठाण्यात पहिल्यांदाच फटाक्यांच्या कर्कशतेची तपासणी रायलादेवी लेक प्रिमायसेस् येथे करण्यात आली. यावेळी बाजारातून ९ विविध कंपन्यांचे फटाके आणले होते. क्रांती फायरवर्कसचा सद्दाम मेगा बॉम्ब, मराठा फायरवर्क्सच्या लायन किंग, जम्बो फायरवर्कसच्या जम्बो बॉम्बस् ग्रीन, स्टँडर्डस् फायरवर्क्सच्या पीकॉक, शामा फायरवर्क्सच्या पाऊस (व्हॉल्कॅनो), स्टँडर्ड फायरवर्क्सच्या टू साऊन्ड पीकॉक, मोहना फायरवर्क्सच्या शिवप्रिया १००० या प्रत्येकी एका फटाक्याची तपासणी केली. हे सर्व उच्चतम पातळीपेक्षा कमी आढळले आहेत.
तर के.आर.फायरवर्क्सच्या के.आर.१०००, ए. आर. जे. फायरवर्क्सच्या ५००० बॅड बाय या माळांची पातळी मर्यादेपेक्षा अधिक आढळली आहे.
काही कंपन्यांनी आपल्या पॅकिंग कव्हरवर फटाक्यांसाठी वापरलेल्या रसायनाबरोबर आपले उत्पादन ध्वनि प्रदूषण मर्यादेत असल्याचे छापले आहे. तर काही कंपन्यांनी मात्र दोहोंपैकी कसलाच उल्लेख केलेला नाही. यावेळी मुंबई मुख्यालयाचे वैज्ञानिक अधिकारी एस. सी. कोल्लूर, ठाण्याचे प्रादेशिक अधिकारी एन.जी.निहूल आदी उपस्थित होते.
फटाक्यांचा हा तपासणी अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरही अपडेट करण्यात आला असून या माध्यमातून सर्वसामान्यांत कर्कश फटाक्यांचा वापर टाळण्याच्या दृष्टीने जागृती केली जाणार आहे.