जिल्ह्यात संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त
By Admin | Updated: February 21, 2015 22:14 IST2015-02-21T22:14:25+5:302015-02-21T22:14:25+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षांना शनिवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला.

जिल्ह्यात संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त
अलिबाग : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षांना शनिवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण ३० परीक्षा केंद्रांवर एकूण ३१ हजार १४१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात विज्ञान शाखेचे १० हजार २९२, वाणिज्य १० हजार ४८९, कला शाखेचे ९ हजार ४५९ तर एमसीव्हीसीचे ९०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
पहिल्या दिवशी सर्वत्र शांततेत परीक्षा झाली. कॉपी व अन्य अनुचित प्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्ह्यात चार सदस्य असलेली सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. परीक्षा वेळेच्या एक तास अगोदर शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी यादी घेऊन येणार व शिक्षणाधिकाऱ्यांसह भरारी पथक या केंद्रास भेट देऊन पाहणी करणार असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित केंद्रप्रमुखास जबाबदार धरण्यात येणार असल्याचे भांगे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
कर्जत तालुक्यातून १९५२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. तालुक्यातील तीन केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. एकूण ७९ कक्ष यासाठी उपलब्ध करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तीनही केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परीक्षेसाठी परिरक्षक म्हणून गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये तर उप परिरक्षक म्हणून शिवाजी कावरे काम पाहत आहेत.
कर्जत तालुक्यातील कर्जत केंद्रावर ४१ कक्षांमध्ये १०२१, नेरळ केंद्रावर २२ कक्षांमध्ये ५४० आणि कशेळे केंद्रावर १६ कक्षांमध्ये ३९१ असे एकूण १९५२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. या तीन केंद्रांवर बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आसनव्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी एकच गर्दी केली होती. आपला कक्ष कुठे आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची एकच धांदल उडत होती. शिक्षक ध्वनिक्षेपकावरून सूचना देत होते.