Join us  

'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' उभारणार; ठाकरे सरकारची घोषणा

By प्रविण मरगळे | Published: September 28, 2020 9:21 PM

“भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक दर्जाचे संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय”

मुंबई - गाणसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  मुंबईत 'मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय' सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगितकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे  देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारकडून लता दीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्यांनाही हा निर्णय नक्कीच आवडेल. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील. असे सांगून उदय सामंत यांनी  लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर लता मंगेशकर यांनीही आनंद व्यक्त केला.

टॅग्स :लता मंगेशकरउद्धव ठाकरेउदय सामंत