स्वच्छता अभियानाचे गांभीर्य संपले

By Admin | Updated: November 10, 2014 00:34 IST2014-11-10T00:34:24+5:302014-11-10T00:34:24+5:30

पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला दिलेल्या प्रतिसादाचे गांभीर्य संपल्याचे पालिकेच्याच तलाव परिसरात साठलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट होत असले

The seriousness of cleanliness campaign ended | स्वच्छता अभियानाचे गांभीर्य संपले

स्वच्छता अभियानाचे गांभीर्य संपले

राजू काळे, भार्इंदर
पालिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला दिलेल्या प्रतिसादाचे गांभीर्य संपल्याचे पालिकेच्याच तलाव परिसरात साठलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट होत असले तरी त्याचे सोयरसुतक प्रशासनाला नसल्याचे दिसते आहे.
पालिकेचे शहरात सुमारे २० तलाव असून त्यावर बांधकाम विभागाचे नियंत्रण आहे. यातील अनेक तलाव खाजगी ठेकेदारांना देखभाल, दुरुस्तीसाठी देण्यात आले असून तलावांतील स्वच्छताही ठेकेदाराने राखणे बंधनकारक आहे. परंतु, या तलावांतून उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने ठेकेदारांकडून तलावांतील पाणी व मासळीच्या विक्रीकडेच लक्ष केंद्रित केले जात असल्याने तेथील स्वच्छतेसह दुरुस्तीकडे दुर्लक्षच होत असल्याचे अनेकदा दिसून येते. यामुळे तलावांतील अस्वच्छता वाढून परिसरात दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु, त्याकडे ठेकेदारासह प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी भारत स्वच्छ अभियानाची घोषणा केल्याने त्याला पालिकेने चांगला प्रतिसाद देत अस्वच्छतेचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या १७५ शौचालयांनाच स्वच्छ करण्याचा उद्देश राखला आहे. त्यातील स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ३५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, केवळ मर्यादित स्वच्छतेचे अभियान सुरू करणाऱ्या प्रशासनाचे पालिका अखत्यारीत असलेल्या तलावांतील अस्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
यावरून प्रशासनाने स्वच्छता अभियानाचा घेतलेला वसा टाकून दिला की काय, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अलीकडेच जिल्हा प्रशासनाने शहरात फोफावलेल्या डेंग्यू व मलेरिया आजारांत पालिकेला संवेदनशील घोषित केले असतानाही स्वच्छतेचे गांभीर्य राखले जात नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The seriousness of cleanliness campaign ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.