Join us  

एनएससीआय वरळी डोममध्ये विलगीकरण कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 7:06 AM

रॅपिड टेस्टिंगसाठी सज्जता, महापालिकेने केली पाचशे खाटांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय ) वरळी डोम स्टेडियममध्ये पाचशे खाटांच्या विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.वरळी परिसर सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने संवेदनशील बनला आहे. वरळी कोळीवाडा, वरळी बी.डी.डी. चाळ परिसरात कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, जिजामाता नगर, ना.म.जोशी मार्ग परिसरातही कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर एनएससीआय डोममध्ये पाचशे खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने दोन दिवसांत या स्टेडियमचे विलगीकरण कक्षात रूपांतर करण्यात आले. पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही याबाबत ट्विट करून माहिती दिली. कोरोनाबाधितांचा शोध आणि तपासणीच्या कामात या कक्षाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टिंगची परवानगी मिळाली आहे. यासाठी आवश्यक किट दाखल होताच महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. यावेळी कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, वरळी परिसर अतिधोकादायक क्षेत्रात मोडत असतानाही एनएससीआयचे समिती सदस्य विरेन शाह यांनी डोम परिसरात माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यामुळे त्यांच्या स्वत:चे तसेच इतरांचे जीव त्यांनी धोक्यात टाकल्याने शाह यांच्याविरोधात पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.अशी आहे व्यवस्था...महापालिकेने वरळी, एनएससीआय येथे ५०० कोरोना संशयितांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. या सर्व व्यवस्थेची पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी करून आढावा घेतला. यातील १०० बेडची व्यवस्था शिवसेना वरळी विधानसभेमार्फत करण्यात आली आहे. यामध्ये बेडशीट, टॉवेल, साबण, तेल, टूथपेस्ट व टूथब्रश, बिस्कीट, सॅनिटायझर इ. वस्तू असलेले ३०० किट उपलब्ध आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस