सेनेचे हेल्थकार्ड तर भाजपाचे आरोग्य
By Admin | Updated: June 15, 2015 23:30 IST2015-06-15T23:30:11+5:302015-06-15T23:30:11+5:30
आगामी काळात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित

सेनेचे हेल्थकार्ड तर भाजपाचे आरोग्य
डोंबिवली : आगामी काळात होणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्लृप्त्या लढविल्या आहेत. रविवारी याचा प्रत्यय ठिकठिकाणी आला. भाजपाने आरोग्य शिबिर, शिवसेनेने राजीव गांधी हेल्थकार्ड तर मनसेने विनामूल्य चार हजार वह्यांचे वाटप केले. शहरात सकाळपासूनच पावसाच्या सरींवर सरी बरसत असतानाही डोंबिवलीकरांनी मात्र शिबिरांची ही नामी संधी सोडली नाही. हजारो नागरिकांनी ठिकठिकाणच्या शिबिरांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.
भाजपाच्या वतीने मनोज पाटील यांच्या माध्यमातून मढवी शाळा परिसरात विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये डोळे, मधुमेह, रक्तदाब, रक्तगट, ईसीजी सीटीस्कॅन, बॉडी चेकअप आदी तपासण्या करण्यात आल्या. त्यास हेमंत बारस्कर, शशिकांत कांबळे, गुरुनाथ पाटील, यशवंत भाताडे यांचे सहकार्य लाभले. शिवसेनेच्या वतीने राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांच्या वतीने मोफत आरोग्य विमापत्र व पॅनकार्ड शिबिर घेण्यात आले होते. त्यात एस. मिराशी, उमेश साळवी आदींसह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच तब्बल राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा ५४०० लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. येथील ज्ञानेश्वर मठ संचालित हिंदी विद्यालय, शिवमंदिर रोड येथे हा उपक्रम राबविल्याचे मोरे म्हणाले.
विनामूल्य वह्या घेण्यासाठी पालकांची झुंबड
सोमवारपासून शाळांचा शुभारंभ होणार असून ठिकठिकाणी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्याचप्रमाणे शहरातील एकतानगरमध्ये मोफत वह्यांचा लाभ घेण्यासाठीही नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मनसेचे नगरसेवक राजन मराठे यांनी गरजूंना चार हजार वह्यांचे वाटप केले. केवळ त्यांच्याच नव्हे तर अन्य प्रभागांतील नागरिकांनीही त्याचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.