प्रचारसभांच्या आयोजनात सेनेची बाजी
By Admin | Updated: February 16, 2017 02:32 IST2017-02-16T02:32:01+5:302017-02-16T02:32:01+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीचा २३ फेब्रुवारीला निकाल काय लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तूर्तास त्यापूर्वी निवडणुकीतील

प्रचारसभांच्या आयोजनात सेनेची बाजी
सुशांत मोरे / मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीचा २३ फेब्रुवारीला निकाल काय लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तूर्तास त्यापूर्वी निवडणुकीतील प्रचारसभांत शिवसेनेने बाजी मारली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक १९ सभा मुंबईत होत आहेत. यानंतर, बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात भाजपाचा दुसऱ्या तर राष्ट्रवादी आणि मनसेने शेवटच्या अर्थात, तिसऱ्या स्थानी आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला. प्रामुख्याने बड्या नेत्यांच्या प्रचारसभांचेच नियोजन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे प्रचारसभांत उतरले. मात्र, या आयोजनांमध्ये शिवसेनेनेच आघाडी घेतली.
मुंबईत शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत १९ सभा होत आहेत. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा गिरगाव येथे पार पडली, तर शेवटची सभा १८ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील बीकेसीमध्ये होईल. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या सभा घेतल्या जात असतानाच, भाजपानेही सभांचा धडाकाच लावला. मात्र, यात भाजपा काहीशी मागेच राहिली. देवेंद्र फडणवीस यांच्या साधारपण दहा ते बारा सभा होत आहेत. भाजपाचीही शेवटची सभा मुंबईत १८ फेब्रुवारी रोजी होईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बड्या नेत्यांच्या फक्त चारच सभा मुंबईत आहेत. शरद पवार यांच्या दोन सभा मुंबईत झाल्या, तर अजित पवार यांचीही एक सभा झाली. सुप्रिया सुळे यांची दिंडोशी येथे एक सभा पार पडेल. मुंबईत १८ फेब्रुवारी रोजी आमदार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. गेल्या पालिका निवडणुकीत जास्त सभा घेणाऱ्या मनसेच्या यंदा प्रचारसभांचा आलेख चांगलाच खाली आला आहे. मुंबईत फक्त तीनच सभा घेण्याचे नियोजन केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विक्रोळी आणि विलेपार्ले येथे १४ फेब्रुवारी रोजी सभा झाल्या. १८ फेब्रुवारी रोजी मनसेची दादर येथे शेवटची सभा होईल.