Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची वेतनवाढ वर्षभरासाठी रोखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 06:13 IST

लाचलुचपत विभागाने अटक केल्यानंतर पाटील यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानुसार ही शिक्षा त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून सुनावण्यात आली आहे.

मुंबई : धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांची वेतनवाढ वर्षभरासाठी रोखण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यातील तीन कॉन्स्टेबलना लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केल्यानंतर पाटील यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानुसार ही शिक्षा त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून सुनावण्यात आली आहे.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या नात्याने पाटील यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांवर नजर ठेवत सतर्क राहणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे तीन कॉन्स्टेबल संजय तळेकर, मुकुंद शिंदे आणि प्रतीक मेहेर हे धारावीत एका चायनीजच्या गाडीवाल्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. त्यानंतर पाटील यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. तसेच ही चौकशी संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले.मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हानही त्यांनी स्वीकारले आहे. त्यानुसार पाटील यांच्या या निष्काळजीपणासाठी वर्षभरासाठी वेतनवाढ दिली जाऊ नये, असा निर्णय त्यांनी घेतलाआहे.भविष्यातील वेतनवाढीवर या शिक्षेचा कोणताही परिणाम होऊ न देता निव्वळ आगामी वार्षिक वेतनवाढ रोखण्याचे हे आदेश असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.