ज्येष्ठ नागरिकांना औषधेही मिळणार मोफत, ‘स्थायी’चा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:04 IST2018-07-06T03:03:07+5:302018-07-06T03:04:05+5:30
मुंबई महापालिका रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कारण महापालिका रुग्णालयात येणा-या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसह सिटीस्कॅन, एमआरआयची तपासणीही मोफत होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना औषधेही मिळणार मोफत, ‘स्थायी’चा हिरवा कंदील
मुंबई : मुंबई महापालिका रुग्णालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. कारण महापालिका रुग्णालयात येणा-या ज्येष्ठ नागरिकांची पाच हजारांपर्यंतच्या शस्त्रक्रियेसह सिटीस्कॅन, एमआरआयची तपासणीही मोफत होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातून डिस्चार्ज (घरी सोडल्यावर) दिल्यावर औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या २००४च्या परिपत्रकानुसार पालिका रुग्णालयात येणाºया ज्येष्ठ नागरिकांकडून उपचारासाठी पैसे आकारले जात असत. मात्र पालिका प्रशासनाने या प्रस्तावात बदल करण्याचा निर्णय घेतला आणि मोफत उपचार देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या नवीन प्रस्तावानुसार पालिका रुग्णालयात येणाºया ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता अजय राणे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
पालिका रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी दाखल झाल्यावर त्यांच्याकडून ५०० रुपयांची आकारणी करण्यात येते. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांचा कोणी सांभाळ करणारे नसते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांचा विचार करत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. पालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात वृद्धांसाठी विशेष खाटांचा वॉर्ड तयार केला जाईल. वृद्धांच्या तपासणीसाठी रुग्णालयात वेगळा कर्मचारी वर्गही नेमला जाईल. तसेच त्यांच्यासाठी वेगळ्या ओपीडी, लॅब व फिजिओथेरपी युनिटचीही व्यवस्था केली जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले. या प्रस्तावाला आरोग्य समितीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
वयाचा दाखला देणे अनिवार्य
राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अशा प्रकारची सुविधा मिळते. या पार्श्वभूमीवर २०१७मध्ये मुंबई महापालिकेतही अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. या सुविधेसाठी वृद्धांना वयाचा दाखला देणे आवश्यक असून त्या आधारावर रुग्णाला ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत ठेवले जाणार आहे. महापालिकेतर्फे आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा (एचएमआयएस) सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या यंत्रणेमुळे ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा पुरवणे सोपे होणार आहे.