११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

By मनीषा म्हात्रे | Updated: June 26, 2025 15:02 IST2025-06-26T15:01:45+5:302025-06-26T15:02:48+5:30

वयाच्या साठीत प्रवेश केल्यानंतर अनेकांना आपलेपणाची साथ हवी असते. एखाद्याशी दिलखुलास गप्पा माराव्यात आपुलकीने कोणतरी 'आपलं म्हणावं' असे वाटत असते.

senior citizen women duped for 11 lakhs on facebook | ११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

मुंबई

मनीषा म्हात्रे

वयाच्या साठीत प्रवेश केल्यानंतर अनेकांना आपलेपणाची साथ हवी असते. एखाद्याशी दिलखुलास गप्पा माराव्यात आपुलकीने कोणतरी 'आपलं म्हणावं' असे वाटत असते. अॅण्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका आजींनीही अशाच भावनेने फेसबुकवर 'रिलेशनशिप ब्युरो'च्या जाहिरातीवर क्लिक केले. परदेशात राहणार्‍या एका अनोळखी व्यक्तीला 'भाऊ' मानून भावनांचे नाते जोडले. मात्र या भावनिक नात्याची किंमत त्यांना १० लाख ८७ हजार रुपयांनी चुकवावी लागली आहे. 

६० वर्षांच्या आजीचे पती शिपिंग कंपनीत असल्याने त्या एकट्याच घरात असतात. १९ एप्रिलला फेसबुकवर सर्चिंग सुरू असताना 'रिलेशनशिप ब्युरो'ची विचित्र, पण आकर्षक जाहिरात त्यांच्या नजरेस पडली. 'भाऊ-बहिण नातं जोडायचे आहे का?परदेशात राहणारे व्यावसायिक आपली वाट पाहत आहेत!", असा मजकूर त्यावर होता. त्यानुसार, लंडनमध्ये व्यवसाय करणाऱ्या सुरज सिंग या तरुणाला भाऊ म्हणून स्वीकारण्याची इच्छा आजींनी व्यक्त केली. 

२४ एप्रिलला 'हाय दीदी, आपने गैर को भाई माना...", असा एक गोडसा व्हॉट्सअॅप मेसेज आला. नंतर सुरज नावाचा अनोळखी माणूस, आजींशी आपुलकीने बोलू लागला. भावाच्या नात्याने बांधले गेलेले दोघे गप्पा मारत होते. तो त्यांना दीदी म्हणत होता, गिफ्ट्सची यादी सांगत होता. लंडनहून भारतात येतोय, भेटायला...आणि तेवढंच क्षणिक सुख पुरेसे होते. 

भाऊ येणार म्हणून घरात गोडधोड केले. सगळी तयारी सुरू असतानाच २५ एप्रिलला सुरजने फोनद्वारे मी दिल्ली विमानतळावर उतरलोय, पण कस्टम ऑफिसरने डॉलर्स जास्त प्रमाणात असल्याने पकडल्याचे सांगितलं. पुढचा कॉल कस्टम अधिकाऱ्याच्या नावाने फोन आला. त्यापाठोपाठ बँक अधिकाऱ्याच्या नावाने वेगवेगळी कारणे पुढे करत त्यांच्याकडून १३७ ट्रान्सझॅक्शनमध्ये १० लाख ८७ हजार रुपये उकळले. यामध्ये जीएसटी, टॅक्स, कस्टम फी अशी अनेक कारणे पुढे करण्यात आली होती. आणखी पैशांची मागणी होताच आजीला संशय आला. त्यामुळे त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. तेव्हा तो नॉट रिचेबल झाला. अखेर, भावाचा मुखवटा चढवून बोलणारा प्रत्यक्षात सायबर भामटा असल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. आजींनी मध्य सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. 

चिंतेची बाब...
आतापर्यंत लग्न, प्रेमसंबंध याच्या नावाखाली सायबर गुन्हे झाले, पण आता भाऊ बहिण या सारख्या नात्याच्या आडूनही भामट्यांनी फसवणूक सुरू केली असून ही चिंतेची बाब आहे. 

सतर्क राहा..
त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी नाते जोडताना सतर्क राहा, शहानिशा करा. कोणीही जर पैशांची मागणी करत असेल तर तो भाऊ असो वा प्रियकर फसवणुकीची शक्यता नक्कीच आहे. अशा घटनांची त्वरित माहिती सायबर क्राइम हेल्पलाइन किंवा सायबर पोर्टलवर तक्रार द्या, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच महिन्यांत १८४१ सायबर गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यापैकी १२९५ प्रकरणे फसवणुकीशी संबंधित आहेत. यातील बळी ठरणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. 

Web Title: senior citizen women duped for 11 lakhs on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.