Siddhivinayak Mandir Dress Code News: सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शालीनता जपणारे व मंदिराचे पावित्र्य राखले जाईल, असे कपडे घालून दर्शनासाठी यावे. तोकडे कपडे, फाटकी जीन्स घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने जारी केल्या. या सूचनांचे महिला वर्गाने स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्येने या निर्णयाला विरोध दर्शवत थेट राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
सिद्धिविनायक मंदिराच्यावतीने माघी गणेशोत्सवाची माहिती देण्यास आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उत्सवाची रूपरेषा समजावून सांगतानाच मंदिराने भाविकांसाठी वरील सूचना जारी केल्याचे सांगितले. शिवाय मंदिराकडून प्रसादाचे प्लास्टिक पाऊच बंद करून कागदी पाऊचचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सांगितले. मंदिरात दर्शनास येणाऱ्या अनेक महिला तोकडे कपडे घालून येत असल्याच्या तक्रारी महिलांनी मंदिर प्रशासनाकडे केल्या होत्या. यावरच हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच हा निर्णय ०१ फेब्रुवारी २०२५ पासून लागू केला जाणार असून, तसा फलक लावल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला असून, वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते यांनी थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत काय म्हटले आहे?
मी झेन सदावर्ते १२ वीत शिकत असून नॅशनल ब्रेवरी अवार्डची विजेती आहे. सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला. भक्तांवर लादण्यात आलेला हा ड्रेस कोड सामाजिकदृष्ट्या चुकीचा आणि भेदभाव करणारा आहे, असे माझे मत आहे. सिद्धिविनायक मंदिरात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. शिवाय, भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असलेल्या देशात सर्व नागरिकांना त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्याची परवानगी असणे, आवश्यक आहे. कपडे घालण्यावरुन सार्वजनिक, धार्मिक ठिकाणी भेदभाव करणे चुकीचे आहे. भक्तांनी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा का घालाव्यात? श्रद्धेचा गाभा भक्तीमध्ये आहे, परिधान केलेल्या कपड्यात नाही. मी नम्रपणे विनंती करते की, ड्रेस कोडच्या नियमांचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा. मंदिर प्रशासनाने भेदभाव करणाऱ्या या नियमांबाबत सुधारणा केली पाहिजे. महिलांनी स्कर्ट, शॉर्ट्स घालून सिद्धिविनायक मंदिरात येऊ नये, असे म्हणणे महिलांसोबत अन्याय आहे. संविधानाच्या तरतुदींची पायमल्ली आहे, असे झेन सदावर्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, काही ना काही मुद्दा काढून लोकांच्या भावना पेटवायच्या आणि पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात करून द्यायची, असे यानिमित्ताने होताना दिसत आहे. वर्षानुवर्षाची जी प्रथा आहे, ती तशीच सुरू राहिली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केली. स्वाभाविक आहे की, लोक आणि भक्तजन मूर्ख नाहीत. तेही देवासमोर नतमस्तक होताना काय आपण कपडे घातले पाहिजेत, कशा प्रकारे जायला पाहिजे, या भावना त्यांच्या असतात. अशा प्रकारे काही नियम काढून भक्तांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होत आहे का, असा प्रश्न आहे, असे सचिन अहिर म्हणाले.