मुंबई : नटसम्राट, छत्रपती ताराराणी अशा विविध २९ मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी आणि गुजराती रुपेरी पडद्यावरही भूमिका गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर आयुष्याच्या संध्याकाळी मात्र विपन्नावस्थेत खितपत आहेत.
‘अशी जाते अक्कल’ या चित्रपटाच्या माध्यमातून ३७ वर्षांपूर्वी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवणारे ७७ वर्षीय मनमोहन माहिमकर मूळचे गिरगावचे. ते पूर्वी राहात असलेल्या सदाशिव लेनमधील जुन्या इमारतीचा पुनर्विकास सुरू असल्याने माहिमकर सध्या मुगभाट लेन परिसरात भाड्याच्या घरात राहतात. आपली व्यथा मांडताना माहिमकर म्हणाले, ‘दोन वर्षांनी नवीन घराचा ताबा मिळणार आहे. पण, थोरला भाऊ जगदीश आणि वहिनी रेखा माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. वहिनी वारंवार धमक्या देत आहे. पोलिसांकडे मदत मागितली. पण, कौटुंबिक प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले.
- विकासकाने खोलीचे भाडे न दिल्याने सध्या राहात असलेल्या खोलीचे १३ हजार रुपये महिन्याप्रमाणे वर्षाचे भाडे भरण्यासाठी एफडी मोडावी लागली. इतर सर्वांना विकासकाने भाडे दिले. पण, आम्हाला दिले नाही.
- सरकारकडून पाच हजार रुपये पेन्शन मिळते. पण, औषधे आणि जेवणासाठी महिन्याला १२ ते १५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून मिळणारी पेन्शनही बंद झाली आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे भाऊ - वहिनीचा दबाव अशा दुहेरी दुष्टचक्रात अडकलो आहे’.