सेनेत नाराजीनाट्य कायम
By Admin | Updated: February 15, 2015 00:23 IST2015-02-15T00:23:33+5:302015-02-15T00:23:33+5:30
महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना शिवसेनेतील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत
सेनेत नाराजीनाट्य कायम
नवी मुंबई : महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना शिवसेनेतील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. नेरूळमध्ये झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी व्यासपीठावर बसण्यास नकार दिला. निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास ठाणे जिल्'ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात शहर प्रमुखापासून सर्व पदाधिकारी व्यासपीठावर बसले होते. परंतु जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिलेले विजय चौगुले मात्र खाली पहिल्या रांगेत बसले होते. खासदार व मंत्री महोदयांनी त्यांना वारंवार व्यासपीठावर या असे सांगितले, परंतु ते अखेरपर्यंत व्यासपीठावर गेलेच नाहीत. वारंवार बोलावूनही व्यासपीठावर न आल्यामुळे नेत्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीही स्पष्ट दिसून आली. काही दिवसांपूर्वी वाशीतील मेळाव्यात व्यासपीठावर बसलेल्या चौगुले यांचा नामोल्लेखही काही नेत्यांनी केला होता. त्यांचा अनुल्लेखाने अपमान केला होता. पालिका निवडणुकीच्या निर्णय प्रक्रियेतही विश्वासात घेतले नसल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. उपनेते विजय नाहटा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील त्यांची व समर्थकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता.
या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे आठवड्यातून किमान एक दिवस नवी मुंबईत येऊन संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडणुका जवळ आल्या असून एकमेकांच्या तक्रारींपेक्षा निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन केले. या मेळाव्यात मनसेचे शिरीष पाटील, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी व इतर कार्यकर्ते, काँगे्रसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केला. (प्रतिनिधी)
मतभेद कधी मिटणार
पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्वच वक्त्यांनी केले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मेळावा असला तरी चौगुले यांच्या नाराजीमुळे संघटनेतील मतभेदांचे प्रदर्शन सर्वांसमोर झाले . हे मतभेद कधी मिटणार, असा प्रश्न आता संघटनेत विचारला आहे.