व्यायामशाळेवरुन सेनेची नाचक्की
By Admin | Updated: July 17, 2015 02:34 IST2015-07-17T02:34:40+5:302015-07-17T02:34:40+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झालेल्या मरीन ड्राईव्ह येथील खुली व्यायामशाळा गुरुवारी सकाळी बेकायदा ठरवत पालिकेच्या सी विभाग

व्यायामशाळेवरुन सेनेची नाचक्की
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झालेल्या मरीन ड्राईव्ह येथील खुली व्यायामशाळा गुरुवारी सकाळी बेकायदा ठरवत पालिकेच्या सी विभाग कार्यालयाने उचलली़ सत्ताधारी शिवसेनेलाच आव्हान देणाऱ्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली़ सेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे वेगाने चक्र फिरली़ ही व्यायामशाळा अधिकृत असल्याचे विभाग अधिकाऱ्याला माहित नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे समोर आले आणि काही तासांत व्यायामशाळा पुन्हा जागेवर आली़
प्रसिद्ध अभिनेता दिनो मोरियाच्या संकल्पनेतून ही व्यायाम शाळा शहरातील काही भागांमध्ये उभारण्यात येत आहे़ धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ काढून मुंबईकरांना व्यायाम करणे शक्य व्हावा म्हणून मोक्याच्या ठिकाणी रस्त्यावरच व्यायामचा स्टॉप तयार करण्यात येत आहे़ त्यानुसार वरळी सीफेस, वांद्रे बॅण्डस्टँड, दादर शिवाजी पार्क, फाईव्ह गार्डन्स या ठिकाणी अशी व्यायाम शाळा सुरु करण्यात येत आहे़ मरीन ड्राईव्ह येथील एऩएस मार्गावर बसविण्यात आलेल्या या व्यायाम शाळेचे उद्घाटन आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी
बुधवारी केले़ मात्र या उद्घाटनला २४ तास उलटण्याआधीच आज सकाळी ९ च्या सुमारास सी विभाग कार्यालयातील कामगारांनी ही व्यायाम शाळा उचलली़ या कारवाईमुळे शिवसेनेत संतापाची लाट उसळली़ ए आणि सी विभागाच्या सीमेवर असलेल्या या व्यायाम शाळेला पालिकेची पूर्वपरवानगी असल्याचे सी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांना माहित नसल्याने गोंधळ उडाल्याचे कळले. अखेर हसनाळे यांनी माफी मागत ही व्यायामशाळा त्वरित जागेवर बसविण्यात येईल, अशी ग्वाही दिली़ (प्रतिनिधी)
दोन वर्षांनंतर परवानगी
विनामूल्य खुली व्यायामशाळा ही संकल्पना दोन वर्षांपूर्वी अभिनेता दिनो मोरिओ यांनी आणली़
मात्र मरीन ड्राईव्ह येथे अशी व्यायामशाळा सुरु करण्यासाठी पुरातन वास्तू समितीची परवानगी आवश्यक आहे़ अखेर दोन वर्षांनंतर ही परवानगी मिळाल्यामुळे बुधवारी या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले़
वाहतुकीला त्रास नाही
१० बाय १० जागेत आॅबेरॉय हॉटेल ते गिरगाव चौपाटी या परिसरात ही व्यायाम शाळा उभी करण्यासाठी मोरिओ यांनी एप्रिल महिन्यात पालिका आयुक्तांकडून परवानगी मागितली होती़ या व्यायामशाळेमुळे वाहतुकीला त्रास होणार नाही़ तसेच ही व्यायामशाळा सहज हलविता येईल, अशी असल्याचा दावा मोरिओने केला आहे़