सेनेच्या टेलीमेडिसिनची भाजपाला झाली अॅलर्जी!
By Admin | Updated: February 3, 2015 02:24 IST2015-02-03T02:24:29+5:302015-02-03T02:24:29+5:30
शिवसेनेच्या टेलीमेडिसिन या महत्त्वाकांक्षी योजनेचा सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरंभ झाला. पण या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगला आहे.
सेनेच्या टेलीमेडिसिनची भाजपाला झाली अॅलर्जी!
कलगीतुरा : योजनेच्या शुभारंभास वादाचे गालबोट
मुंबई : शिवसेनेच्या टेलीमेडिसिन या महत्त्वाकांक्षी योजनेचा सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरंभ झाला. पण या कार्यक्रमावरून शिवसेना आणि भाजपात कलगीतुरा रंगला आहे. हा कार्यक्रम पक्षाचा की सरकारी, यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांना लक्ष्य केले आहे.
शिवसेनेची ही योजना असल्याने तसेच कार्यक्रम पक्षाचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. हा कार्यक्रम सरकारी नव्हे, तर पक्षाचा होता तर त्यामध्ये सहभागी होण्याबाबत नोकरशाहीने विवेक बाळगायला हवा होता, अशा शब्दांत भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी नाराजी प्रकट केली. सरकारने या योजनेचा स्वीकार केला तर उत्तम अन्यथा खासगी उद्योग व डॉक्टर यांच्या मदतीने या योजनेचा विस्तार केला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात टेलीमेडिसिन योजनेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही योजना २ फेब्रुवारीपासून राबवण्याचे डॉ. दीपक सावंत यांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्र्यांना या योजनेचे प्रात्यक्षिक देण्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले होते. त्यानुसार शिवसेनेने हा कार्यक्रम राबवला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेश पाठवला होता व तो कार्यक्रमात वाचूनही दाखवण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी या सेवेला दिलेल्या समर्थनाबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. तुम्ही - आम्ही जनतेच्या सेवेकरिता आहोत. परंतु एखादी योजना तुमच्याकडे तर एखादी आमच्याकडे असेल तर वाद निर्माण होणे गरजेचे नाही. लोकांना सेवा देणे आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेने योजनेचा प्रारंभ केल्याबद्दल आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना छेडले असता ही योजना शिवसेनेची असून भविष्यात राज्य सरकार त्यात सहभागी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम शिवसेनेचा असल्याने मुख्यमंत्र्यांना बोलावले नाही, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
निवडणुकीपूर्वी योजनेचे आश्वासन दिले होते. त्यामुळे योजना तयार झाल्यावर जास्त काळ थांबता येत नाही. आपणच पुढाकार घेतला तर काय हरकत, असा विचार केला. सरकारने योजनेला मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु योजनेच्या विस्ताराकरिता केवळ सरकारच्या नव्हे, तर खासगी उद्योग व डॉक्टर यांच्या मदतीची गरज आहे. - उद्धव ठाकरे