आत्मभान देणारा रोखठोक ‘आवाज’!
By Admin | Updated: January 23, 2015 23:02 IST2015-01-23T23:02:10+5:302015-01-23T23:02:10+5:30
‘बाळकडू’ या चित्रपटाच्या शीर्षकातून असेच बरेच काही मार्मिकपणे स्पष्ट होत जाते आणि या चित्रपटाचे प्रतिबिंब त्यात पडलेले जाणवते.

आत्मभान देणारा रोखठोक ‘आवाज’!
एखाद्या चित्रपटाचे शीर्षकच अनेकदा बोलके असते आणि त्यातून नेमका अर्थ ध्वनित होण्याची किमयाही साधलेली असते. ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या शीर्षकातून असेच बरेच काही मार्मिकपणे स्पष्ट होत जाते आणि या चित्रपटाचे प्रतिबिंब त्यात पडलेले जाणवते. ‘बाळकडू’ या शब्दातच काहीतरी गुणकारी देण्याचा अर्थ दडलेला आहे आणि त्यानुसार हा चित्रपट विचारांचे बाळकडू पाजण्याची भूमिका अचूक बजावतो. मनात आत्मभान जागवण्याचे काम करतानाच, जे काही पोहोचवायचे आहे ते दमदार आवाजात व रोखठोकपणे पोहोचविण्याची कामगिरीसुद्धा हा चित्रपट पार पाडतो.
शाळेत इतिहास हा विषय शिकवणारा बाळकृष्ण मुंबई सोडून उपनगरात राहायला आला आहे. शाळेत त्याची मास्तरकी तशी चांगली चाललेली असते आणि इतिहास शिकवण्याची त्याची पद्धत विद्यार्थ्यांना आवडत असते. पण त्याची एक व्यथा असते आणि ती म्हणजे त्याला अधूनमधून इतिहासातल्या थोरामोठ्यांचे आवाज ऐकू येत असतात. या समस्येवर तो उपचार घेत असतो. काही दिवसांनी इतर आवाज लुप्त होऊन त्याच्या कानांत केवळ बाळासाहेब ठाकरे यांचाच आवाज घुमू लागतो आणि त्यातून बाळकृष्णमधला सामान्य मराठी माणूस पेटून उठतो. मराठी माणसाने रडत न बसता लढण्याचा पण केला पाहिजे अशी भावना त्याच्या मनात प्रकर्षाने मूळ धरू लागते. दुसऱ्यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे, अशा निश्चयाने तो समाजातल्या मराठीजनांत अंगार जागृत करतो. त्याच्या या त्वेषामागे असतो, तो केवळ बाळासाहेबांचा आवाज! हा या चित्रपटाचा आशय आहे आणि पुढे हाच परिपाठ चालवत चित्रपटाची गोष्ट सूचकतेने बाळकडू पाजत जाते.
मराठी माणसाच्या मर्मावर बोट ठेवत त्याला लढण्याची शिकवण हा चित्रपट देत राहतो. चित्रपट थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निगडित असला, तरी हा त्यांचा चरित्रपट नव्हे; तर त्यांचे विचार मराठीजनांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न आहे. यात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पडद्यावर येत नाही; तर कानांत गुंजत राहतो तो त्यांचा ‘आवाज’! चित्रपट उठावदार होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करताना चित्रपटात त्यांचा आवाज बनलेल्या चेतन शशीतल यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. मात्र चित्रपटात बाळासाहेबांची थेट व्यक्तिरेखा नसल्याने त्यांना दृश्य चौकटीत अनुभवण्यासाठी येणाऱ्यांचा काहीसा भ्रमनिरास होऊ शकतो. पण तरीही, बाळासाहेबांचा आवाजच पुरेसा आहे, यावर हा चित्रपट ठाम आहे आणि तेच त्याचे सांगणे आहे.
चित्रपटाची ठरावीक विचारसरणी लक्षात घेता त्यातले ‘बाळकडू’ सगळ्यांच्याच पचनी पडेल अशातला भाग नाही. मात्र चित्रपटाची वैचारिक बैठक पक्की आहे व त्याचे व्यवधान बाळगत स्वप्ना पाटकर यांच्या मूळ कथेवर गणेश पंडित आणि अंबर हडप यांनी चित्रपटाची पटकथा व संवाद लिहिले आहेत. अर्थात चित्रपटाच्या गरजेनुसार ते खणखणीत आहेत. दिग्दर्शक अतुल काळे यांनी अचूक तेच मांडण्याचे भान ठेवत चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट योग्यच म्हणावी लागेल.
चित्रपटाची लांबी जास्त वाटत असली आणि काही प्रसंग अतिरंजित वाटत असले, तरी चित्रपटाचे सादरीकरण धडाकेबाज आहे आणि त्यामुळे चित्रपट अंगावर येतो. काही प्रसंगांत तंत्रज्ञानाची कमाल लक्ष वेधून घेते. बाळकृष्णची भूमिका करणारा उमेश कामत यात बराच भाव खाऊन जातो. त्याच्या कारकिर्दीसाठी ही भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. संपूर्ण चित्रपट त्याच्याच खांद्यावर उभा आहे आणि उमेशने तो चांगला तोलला आहे. त्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे यांनीही यात दमदार कामगिरी पार पाडली आहे.
पूर्णत: नायकप्रधान असलेल्या या चित्रपटात सईची भूमिका रंगवणाऱ्या नेहा पेंडसेला फारसा वाव नाही; परंतु तिच्या वाट्याला आलेले प्रसंग तिने चांगले वठवले आहेत. प्रसाद ओक व टिकू तलसानिया लक्षात राहतात. त्यांच्यासह आनंद इंगळे, भाऊ कदम, शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री आदी कलावंतांनी केलेल्या छोटेखानी भूमिका ठीक आहेत. एकंदरीत, स्वत:चा आतला आवाज ऐकण्यासाठी प्रवृत्त करणारा आणि त्यासाठी बाळकडूची मात्रा पाजणारा हा चित्रपट आहे.
मराठी चित्रपट
राज चिंचणकर