स्वयंघोषित वैज्ञानिक मुनीर खानला अटक
By Admin | Updated: April 1, 2015 00:37 IST2015-04-01T00:37:18+5:302015-04-01T00:37:18+5:30
स्वयंघोषित वैज्ञानिक आणि तंत्रमंत्र करणारा डॉक्टर मुनीर खान याला मंगळवारी सकाळी वर्सोवा पोलिसांनी अटक केली. गेल्या वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए)

स्वयंघोषित वैज्ञानिक मुनीर खानला अटक
मुंबई : स्वयंघोषित वैज्ञानिक आणि तंत्रमंत्र करणारा डॉक्टर मुनीर खान याला मंगळवारी सकाळी वर्सोवा पोलिसांनी अटक केली. गेल्या वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
‘बॉडी रिवायटल’ नावाच्या औषधाची विक्री करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी आधीही खानला अटक करण्यात आली होती. या औषधामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार बरे होत असल्याचा पोकळ दावा खानने केला होता.
खानविरोधात मार्च २०१४ मध्ये एफडीएने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून खान फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी तो त्याच्या वर्सोव्यातील घराकडे येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराकडे सापळा रचला. खान त्याच्या घराजवळ येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या वेळी पोलिसांसोबत एफडीएचे अधिकारीदेखील होते.
त्याने दावा केल्याप्रमाणे त्याच्या औषधांचा रुग्णांना काहीच फायदा होत नव्हता. असे असूनही त्याने ‘बॉडी रिवायटल’नंतर पुन्हा दोन महिन्यांनी ‘क्युअर फॉर आॅल’ नावाचे नवीन औषध बाजारात आणले. त्याची जाहिरातदेखील त्याने दिली होती.
या औषधाची निर्मिती तसेच जाहिरात करणारे त्याचे साथीदार अद्याप फरार असून त्यांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. खानला अटक करून अंधेरी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)