बाळासाहेबांची निवडक भाषणे - भगव्याचं मोहोळ उठवा! उठा सज्ज व्हा…
By Admin | Updated: June 18, 2016 17:13 IST2016-06-18T17:13:23+5:302016-06-18T17:13:23+5:30
शिवसेना आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे यानिमित्ताने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काही निवडक भाषणे

बाळासाहेबांची निवडक भाषणे - भगव्याचं मोहोळ उठवा! उठा सज्ज व्हा…
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…
माणसं येताहेत ना येताहेत! गर्दी होतेय की नाही होत, आपणहून येताहेत? की भाड्याने आणावी लागतात? शिवसेना संपली गर्दी हटली का? मग जरा मोठ्याने ओरडा ना… (श्रोत्यांची घोषणाबाजी) हा असं वाटलं पाहिजे! असं काहीतरी व्हायला पाहिजे! जरा जिवंतपणा पाहिजे. ते मध्ये उभे आहे ते काय आहे (श्रोत्यांच्या गर्दीत उभं केलेल्या बुजगावण्याला उद्देशून. कोण आहे तो कोणाचा आहे तो. मुलायमसिंग? का रबडीचा लालू? काय करणार काय त्याचं नंतर? आग लावणार? आगपेटी आहे का देऊ? बरं… मग ठीक आहे. तसे विचार चिक्कार आहेत, कितीतरी विषय आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही दुसऱ्या पद्धतीने त्यांचे विषय मांडले. माझे विषय स्वतंत्र आहेत. पहिल्यापासून माझा विषय असा आहे की ही शिवशाही गरिबांची शिवशाही असली पाहिजे. इकडे मला गलेलठ्ठ पोट सुटलेली माणसं नकोत, हे आपलं धोरण आहे. त्यादृष्टीने माझे विचार मांडणार आहे आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचा एक लांड्या आणि बिहारचा लांड्या या दोन लांड्यांचा समाचार घेणार. काय वाटेल ते बडबडतात आणि लोक ऐकतात हे विशेष. त्या वेळेला उसळून उभं राहिलं पाहिजे की वाटेल ते करा, पण हे आम्ही सहन करणार नाही. पण मी त्यांना धन्यवाद देतो, धन्यवाद अशासाठी देतो की, हा हिंदू जागा झालाय, संतापलाय, चिडलाय. नाहीतर तुम्ही झोपलेले असता. त्यांनी तेवढं तरी काम केलं. तुम्हाला उठवलं, चवताळून सोडलं. आज सगळ्या देशातला हिंदू चवताळला, शिव्या देतोय त्यांना. तेव्हा ही माणसं त्यांचा मी समाचार घेणार आहे आणि नामदेवरावांनी थोडा खुलासा केला, आंबेडकरांच्या नातवाचा, पण ते काही तेवढं विशेष नाही. काय झालंय त्यांना काही कळत नाही. कॉलिफिकेशन काही नाही, पण आंबेडकरांचा नातू यापेक्षा दुसरं कॉलिफिकेशन काही नाही. मग बिचाऱ्या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम करायचं तेवढाच एक धंदा. आज इथे या दसऱ्याचं सोनं लुटायला आपण आलो आहोत, या देशामध्ये लुटालूटच जास्त असते. आपण काहीच लुटत नाही, ते सोनं लुटतो, ते सोनं कसलं आपट्याच्या पानाचं! तुम्ही मला द्यायचं, मी तुम्हाला द्यायचं, जमलं तर कवटाळायचं. विचाराचं सोनं महत्त्वाचं आहे! आणि द्यायचं म्हणजे काय द्यायचं? झालं, भगवा सप्ताह ठरलाय, पूर्ण महाराष्ट्राला जाग आणायची आहे, म्हणजे झोपलाय म्हणून नव्हे तर उद्या निवडणुका येणार आहेत. असलेली सत्ता जाणार आहे. मुळात ती येणार कुठे हे तुम्हालाही माहीत नव्हतं आणि मला सुद्धा! पण आली. तुमच्या सगळ्यांच्या घामानं, रक्तानं आणि परिश्रमानं आली! (टाळ्या) कोणी आमच्यावर मेहेरबानी केली नाही आणि तेच होणार आहे. पुन्हा दोन हजार वर्ष ही सत्ता खेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही! जे आरोप झाले, काही करा तुम्ही कितीही करा पण प्रसिद्धी कधीही नाही. जहागिरदार हे फार मोठे नामवंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. जहागिरदार यांनी श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे अनेक दिलेत. आज ‘सामन्या’मध्ये छापलेत. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा श्रीकृष्ण आयोग. तो पहिला घेऊ या आणि माझ्यावरती आरोप. बिहार आणि उतर प्रदेशमधले लांडे आले आणि याच शिवाजी पार्कवरती आरोळी ठोकली की, ‘हमारी सरकार जब भी आयेगी तो हम बालासाब ठाकरे को गिरफ्तार करेंगे!’ भडव्यांना सांगायचं त्या वेळेला तुम्ही मुंबईत असा आणि असायलं पाहिजे..(टाळ्या) म्हणजे मुंबई एकदा पेटल्यानंतर त्यामध्ये तुम्हालाही त्यात टाकता येईल! श्रीकृष्ण अहवालावर जहागिरदार म्हणताहेत, ‘जो तो श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कारवाई करा अशी ओरड करत आहे, परंतु आयोगाने कोणाही व्यक्तीस अटक करण्याची किंवा कारवाई करण्याची शिफारस केलेली नाही. मग तुमची इच्छा अटक करा. अटक करा म्हणजे अटक करा. अटक करायला हा बिहार आहे की मुलायमसिंगचा उत्तर प्रदेश? अटक बाळासाहेब ठाकरेंना तुमच्या ताकदीच्या जोरावर होऊ शकत नाही. हा माझा आत्मविश्वास आहे. (टाळ्या) अरे घेतला होतात ना अनुभव तुम्ही मागे सीमा प्रश्नाच्या वेळेला. दहा दिवस मुंबई पेटली. रात्री दीड वाजता मला मी मनोहर जोशी, दताजी साळवी तुरुंगात होतो येरवड्याच्या. आणि तिथे दीड वाजता मधू मेहता आणि ते अमरसिंग कोणीतरी ते आले. बाळासाहेब म्हणे स्टेटमेंट काढा, म्हटलं मी काय करू? मला विचारून अटक केली नाही. आता का विझवा म्हणून सांगायला मला येता. वसंतरावांनी अगदी हट्टच केला मग रात्री दीड वाजता, पावणेदोन वाजता स्टेटमेंट केलं, मग ते वृतपत्रांना आलं आणि म्हणून हा मूर्खपणा एकदा झालाय आणि परत परत करायचा असेल तर करा, बेशक करा मला अटक! पण आपण उपोषण वगैरे करणार नाही हा! त्या भानगडीत पडणार नाही! हट साला हड. घरचा डबा मागवेन, रोज काय काय पाहिजे त्याचा मेनू रिकाम्या डब्यातून पाठवेन. आणि दुसऱ्या दिवशी भरलेला डबा घेईन. हे धंदे आपले नाहीत. मी उपोषणाला वगैरे बसत नाही आणि शिवसेनेमध्ये उपोषणाला वगैरे बसायचं नाही. अगोदर मिळतंय कुठे, तर उपोषणं करताय? हे नाटक आपल्याला जमत नाही, पण आज या एका दृष्टीने महाराष्ट्रावर राज्य करत असताना का तुमचं पोट दुखतंय. माझं आणि पत्रकारांचं वैर नाही, हे किती वेळा सांगतोय तुम्हाला किती तरी वेळा. माझे किती चांगले मित्र बसले आहेत तिथे. आज तर उलट त्या लोकसत्ताकारांचे आभार मानतो, काही चांगलं छापून आलं म्हणून नाही. आजच्या लोकसत्तेमध्ये अप्रतिम लेख आलेला आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. हा जरा वाचा आजच्या लोकसत्तेला. थोडा खप वाढेल आपल्यामुळे, हरकत नाही! १८९३ मधली दंगल आहे, हिंदू-मुसलमानांची आणि बरोबर १०० वर्षांनी १९९३ मध्ये दंगल झाली. पण टिळकांनी त्या वेळी मांडलेली भूमिका शंभर वर्षानंतर कायम आहे. मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही आणि का? टिळक म्हणताहेत मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास भिते. त्यामुळे केव्हा दंगा झाला असताना सरकार हिंदूंची बाजू घेणार नाही. मुसलमान लोकांची अशी समजूत आहे की, ही गोष्ट आमच्यामध्ये निर्विवाद आहे. त्या वेळचा विचार अजूनही कायम होता. सरकार त्या वेळेच ब्रिटिशांचं होतं, गोऱ्या कातड्यांचं होतं. आता काळ्या कातड्यांचं आहे. कातडी बदलली तरी विचार बदलत नाही. नालायकपणा तोच. अजूनही त्यांना तसंच वाटतंय याचं कारण विचार बदललेच नाही. आणि यापुढे ते म्हणताहेत, मुसलमान लोक जर शेफारले असतील तर त्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारची फूस हे होय! मुंबईचे हिंदू जरा चवताळले आहेत. ते मुसलमानांप्रमाणे धर्मवेडेपणाने किंवा अविचाराने नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ होय. एक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली. पोलिसाच्या हातून त्याचं संरक्षण होईना, तेव्हा आपल्या संरक्षणाकरिता त्यांना दंगेखोराचा प्रतिकार करणे भाग पडले. मग आपण काय केलं. आम्हाला ज्या वेळेला कळलं की सरकार त्यांची बाजू घेतंय, पोलीस हतबल दिसतायत त्यांना हुकूमच नाही. आणि त्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं अरे गांडूंचं मरण पत्करण्यापेक्षा मर्दाची अवलाद म्हणून बाहेर पडा. आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर माझा तोच आदेश असेल हे विसरू नका. माझा तोच आदेश असेल. आदेशाची वाट पाहत बसायचं नाही. काय म्हणून फुकट मरायचं? कारण नसताना मरायचं? हां, आगाळी किंवा कागाळी किंवा खुरापत आम्ही काढली असेल तर आम्ही समजू शकतो. पण सगळं तिकडून होत असताना आणि पुन्हा हे आमचे नालायक लोक मुलायमसिंग आणि तो रबडीचा लालू दोन हजार कोटी रुपये पाकिस्तानला द्या. का द्या? कशाकरिता? तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजारधर्म म्हणून… शेजारधर्म? कोण बसले होते तुझ्या शेजारी. कसला शेजारधर्म? अरे त्यांचं जे काय वाटोळे झालं ते त्यांनी केलंय. त्यांनी बॉम्ब फोडले. वाजपेयींनी दोन फोडले आपण एक फोडू या. त्यात खर्च झाले. त्याला आम्ही काय करणार? आपण मदत का करावी तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्यावर फोडावा म्हणून? याकरिता द्यायचे? साले सर्पाची अवलाद! याला दूध पाजता? आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करायचा आणि लांड्यांबद्दल मात्र प्रेम दाखवायचं? दोन हजार कोटी? मुलायमसिंगची वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेस त्याला थोबडवायला पाहिजे होता. पण त्या वेळेला मी शिवसैनिकांना सांगितलं की, जाऊ नका तिथे, घाई करू नका. जाऊ दे बोंबलबोंबल बोंबलतील. आज जहागिरदारांचा माझ्याबद्दलचा रिमार्क कुठेही वर्तमानपत्रात छापला नाही. पण आता मी जे बोलतोय ते प्रत्येक वाक्य चौकट, बॅनर अमूक.. लांडे बोलला, हां, अरे बोललोच मुळी! त्यांनी ते सांगितलं ना मागच्या वेळेला. कोणीतरी बोललं लालू उठून उभा राहिला, लालू बसला नंतर मुलायमसिंग उभा राहिला तर हे गर्दी गेली. मी स्वत: पाहत होतो, मला एकाने टेप आणून दिली. बघा म्हणे गर्दी निघून चाललीय. हा सगळा रस्ता रिकामा. त्याने हिंदूंची व्याख्या केलीय हिंदू कौन है… एडझवंच आहे ते सालं, लालू प्रसाद हे हिंदू किसको बोलते है आयला तोंडामध्ये भरलेला, फुगलेलं तोंड, मिटिंग वगैरे नसली की दोन-दोन दिवस म्हशीपाशी लोळतो, तुपाळ चेहऱ्याचा, मधाळ चेहऱ्याचा, हिंदूची व्याख्या केली म्हणे हिंदू कशाला म्हणतात. हमारी शादी हुई है, हमको शरीर को हलदी लगी हुई है हम हिंदू है! यही बात मुलायम सिंगजी की है, उनकी शादी हुई है, हलदी लगी है तो वो हिंदू है! हे आपल्याला काही पटत नाही मग असं जर असेल तर मुसलमानाचं नेतृत्व करणाऱ्याची सुंथा व्हायलाच पाहिजे! ज्याची सुंथा नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करूच शकत नाही. जाऊन मुसलमानांना विचारा काय रे चाललेल का बिन सुंथ्याचा. सुंथ्यावर जर नेतृत्व अवलंबून नाही ना, तर हळदीचाही प्रश्न नाही. वाजपेयी हिंदू नाही, का म्हणे तर त्यांचं लग्न झालं नाही! हा त्यांनी शोध लावला मग आम्ही पण सुंथेचा शोध लावला की ज्यांची सुंथा नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करू शकत नाही, चालेल? जसं हे चालत नाही तसं हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यानंतर पिवळी होत असेल ती गोष्ट निराळी! मनोहरपंतांना जोरात हसू येतंय. बरं असू द्या. हे काय झालंय व्यंगचित्रकाराचा हलकटपणा असल्यामुळे मध्ये मध्ये चालूच असतं. काय आता करायचं काय, पु.ल. देशपांडेंच्या रावसाहेबांसारखं आहे. रावसाहेबांना पुलं सांगतात अहो रावसाहेब म्हणे बायका वगैरे असतात जरा शिव्या आवरा. तर रावसाहेब जरा वहिनींसमोर, अहो काय म्हणे वहिनी तुझ्या आईला.. आणि बोलता बोलताच तीन-चार तोंडातून निघून गेल्या. त्या रावसाहेबांसारखं आहे आमचं, वडिलांनी बाळकडू पाजलं, कुणाला अनुभव आले ते आम्ही पाहिले. काय काय भोगलं तेही आम्ही पाहिलं, काय झोडमार आहे, कशी झाली ती. शिव्या द्यायला लागले वडील, वडील देताहेत तर आपण त्यांना मदत केलीच पाहिजे! वडिलांना एकाकी कसं पाडायचं थोडेसे शिकलो. मग आता देतो थोड्या थोड्या ज्या ज्या वेळेस शक्य आहे त्या त्या वेळेस, जशी माणसं असतील तशी. ते असो. पण ही इतकी बालिश माणसं, हिंदूंची व्याख्या काय, कोणाला सांगताय तुम्ही. मी आजपासून तुम्हाला सांगतोय, या देशाला भारत म्हणून नका, इंडिया म्हणू नका आजपासून या देशाला फक्त हिंदुस्थान म्हणा..(टाळ्या) जेवढे जमलेले आहेत तेवढ्या सर्व हिंदूंनी हिंदुस्थान म्हणायचं, भारत म्हणायचं नाही! भारताला माझा विरोध नाही. ‘भारतमाता की जय’ ठीक आहे. पण आमच्या हिंदूंचा ठसा उमटलाच पाहिजे. त्याकरिता कडवट हिंदुत्वाचा नुसता प्रचारच करू नका, तर कडवट हिंदू म्हणून दाखवून द्या की आम्ही हिंदुस्थानातले हिंदू आहोत, नाही तर कशाला काय म्हणून जगायचं आपण, नाही तर पाकिस्तानात बघा, नऊ लोकांनी आपला राष्ट्रध्वज फडकवला. त्यांना अटक झाली आणि शिक्षा झाली! त्याचा निषेध करण्यात आला. काय केलं त्यांनी नऊ फक्त हिंदू, त्यांनी राष्ट्रध्वज हिंदुस्थानचा फडकवला. त्यांना अटक झाली. आणि शिक्षा झाली आणि गदारोळ उठला तिथे, गदारोळ. आणि आमच्याकडच्या दोन फुल्यांची जी मस्ती आहे. वंदे मातरम् आम्ही म्हणणार नाही. उद्या आमची ती तयारी असेल की वंदे मातरम् यांना म्हणायला लावणारच..(टाळ्या) लावलंच पाहिजे, वंदे मातरम् म्हणा. नाही तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाही. नेहरू घराण्याने वाट लावली. सगळ्यांनीच वाट लावली. आणि आता हे वाट लावताहेत नशीब आपल्या या देशाचं की तो मुलायमसिंग बसला नाही तिथे संरक्षणमंत्री म्हणून नाहीतर त्या पाकिस्तानला दोन हजार करोड देऊन या देशाचं दिवाळं काढलं असतं. आमच्यावर आरोप आहे, दिवाळखोरीचा. कोण करतेय! ते दुसरे. लालूचा एक अवतार आहे शरद पवार. दुसरा नमुना आहे तो, दिसतोही तसाच! फक्त त्याच्यापाशी रबडी आहे आणि हा रबडी खातो! इंदूरला म्हणतात आहे मध्य प्रदेशात चांगला पदार्थ आहे. काय दिवाळखोरीचा आरोप करतोय, कसली दिवाळखोरी! ही पाणी योजना, कृष्णा खोरे योजना, तुम्ही अमलात आणायला पाहिजे होती. मला वाटतं १९७८ सालापासून यांच्या हातामध्ये ते बाड आहे. यांनी अमलात आणायला पाहिजे होती. नाही नाही नाही केलं. माझी झोपडपट्टीवासीयांची ही योजना ९० साली शरद पवारांच्या हातामध्ये दिली. नाही केली, ९५ साली ती सत्ता आमच्या हातामध्ये आली. आम्ही केली. या गरिबांना फुकट घरं, केवढे कोलदांडे घातले जाताहेत. ही योजनाच होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झालेत. कोर्टात गेल्यात केसेस, कोर्टामध्ये अडकवायचं आणि पुन्हा बेशरमपणे विचारायचं की योजनेचं काय झालं? घरं कधी देणार? आता दीड वर्ष राहिलं, गरिबांना घर कधी मिळणार? अरे तुम्ही सगळीकडून अडकवलं आम्हाला, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं कसं फाटेल याचे प्रयत्न करतात. सरकार गडगडेल, हे पाहतात आणि हल्ली एकच मुद्दा कधी पत्रकार भेटले की, मनोहर जोशीचं काय? नाही म्हणजे, हे नाही, म्हणजे ते मला कळतंय, ते जाणार प्रश्न कुठे येतोय. रोज सकाळी उठतात कार्यक्रम आटपतात चहा वगैरे घेतात, वर्तमानपत्र वाचतात, मंत्रालयात जातात, महाराष्ट्र फिरतायत. योजना आखलेल्या कशा अंमलात आणायच्या याची विवंचना करताहेत, पण ते कधी जाताहेत? यापेक्षा दुसरा विषय नाही. हे कशाकरिता चालू आहे. मला कळत नाही. तुमची इच्छा काय? एका तरी काँग्रेस मुख्यमंत्र्याला हा प्रश्न विचारलात की माझ्या वयाची उठाठेव करता की तुमच्यानंतर कोण म्हटलं, केसरीला प्रश्न विचारलात? नरसिंह रावाला प्रश्न विचारलात? मग मलाच का विचारताहात? कसली घाई आहे तुम्हाला? माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही आम्हाला मदत करू नका, टीका करायची आहे जरूर करा. सगळं मोडून तोडून टाकतो, पण आज प्रथम या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं सरकार आलेलं आहे. नाही तर सर्वांनी कास धरून काँग्रेसची सरकारं बसवलेली आहेत. मग अशा वेळेला तुम्हाला अभिमान वाटायला नको! की काय आम्ही असं घोडं मारलंय की हे सरकार पडण्याकरिता तुम्ही पाण्यामध्ये देव बुडवून ठेवावे? उद्देश काय? नाही म्हणे होणार, नाही अरे, पण म्हणे का? फेरीवाल्यांच्या बाबतीत माझी स्पष्ट भूमिका आहे, महापौर इथे बसलेले आहेत, मुख्यमंत्री आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने हॉकर झोन आखलेले आहेत ते मी मान्य करणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही, अहो जिथे शांतता आहे तिथे ती बिघडवायची का? कशाकरिता? मी महापौरांना विचारलं म्हटलं हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही पट्टे मारले. महापौर म्हणे तिथे नारळवाले बसवणार नारळवाले आणि ते तासडून जातील ते कोणी उचलायचं? हॉकर्स झोन याचा अर्थ असा नव्हे की, जिथे शांतता आहे जिथे हॉकर्स बसतच नव्हते, तिथे हॉकर्स आम्ही बसू देणारच नाही. हे शिवसेनेचं धोरण म्हणून मी जाहीर करतो. मग बसायचे कुठे? म्हटलं बसवायचे कुठे त्यापेक्षा जे अनधिकृत आहे त्यांना घालवून द्या ना त्यांच्या राज्यात! (टाळ्या) त्यांना घालवा, मग बरेचसे कमी होतील. त्यांनी मला दिलंय पुष्कळ. अधिकृत फेरीवाले किती आहेत फार कमी आहेत. दोन का अडीच लाख? दोन का अडीच लाख? असतील फेरीवाले त्यातले अधिकृत किती? फार फार तर पंधरा ते वीस हजार असतील. त्यांना कुठेही बसवू शकता. आज दादरची जनता एकदम खूश आहे. त्यांना असा रस्ता आणि हा फुटपाथ आहे हे त्यांना प्रथम दिसतंय. हे सुख महत्त्वाचं आहे. नाही तर बाई आपली इथून तिथून जातेय आट्यापाट्या खेळतेय. हा जर ऑलिम्पिक गेम आट्यापाट्या असतील आणि ही त्यांना प्रॅक्टिस म्हणून द्यायची असेल तर मात्र ठीक आहे, पण नाही चालणार, गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा, मी योजना काढली. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साधी योजना आहे. गिरणी मालकांची सरप्लस जागा त्याला द्यायची या अटीवर, ती अट अशी ही जागा विकून जे पैसे येतील आणि कामगारांची देणी असतील, असतीलच गिरणी कामगारांची ती पहिली दे, तुला इथून गिरणी हलवता येणार नाही. गिरणी तिथेच राहिले पाहिजे. ज्यांना वॉलियंटरी रिटायरमेंट पाहिजे असेल, ज्यांना गोल्डन शेक पाहिजे असेल, त्यांना तो द्यायचा. हा गोल्डन हॅण्ड कसा आहे की जे रिटायरमेंटचे पैसे तुझे बनताहेत ते तुला आताच दिले, म्हणजे कामगारांचं नुकसान काहीच नाही. आणि हे ऑटोमेशन आलं. नंतर मात्र गिरणी कामगाराचा मुलगा त्याला तिथे ट्रेन करा, नोकरीला ठेवा आणि तुमची नवीन गिरणी चालू करा. ही माझी योजना आहे. कुणीही बेकार होणार नाही. मग हे बेकार नाही झाल्यानंतर बाकीची जागा काय करणार तर वन फोर, वन फोर, वन फोर, वन फोर तुम्ही ठेवावी वन फोर म्हाडाला द्यावी आणि वन फोर नगरपालिकेला द्यावी. मग कामगारांसाठी घरे तरी बांधा, नाही तर तुम्हाला जे करायचे ते करा. ब्युटिफिकेशन करा. ही योजना इतकी उत्तम आहे, सगळ्यांनी मान्य केली पण आता अमलात आणली पाहिजे. याला कोणी विरोध करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचे नेते भडकवतील त्यांना ही योजना आमच्या मुळावर येणारी नसून आम्हाला वाचविणारी आहे. काही राष्ट्रीय मिल मजदूर संघाची तुम्हाला गरज नाही. तिकडे भांडण चाललंय. त्यापेक्षा ही योजना घ्याना. मी प्रत्येक गोष्टीवर विचार करून तुमच्यासमोर प्रश्न मांडतो. आजपासून एकही मंत्री परदेशी जाता कामा नये! काय करतो जाऊन? इंग्लिश येतं? युरोपीयन वगैरे माणसं बोलली की ‘यस’, ‘यस’ करतोय! काय ‘यस’ कळलं काय? कळलं नाही तर ‘यस्’… ‘यस्’… कशाला बोलतोय! आठवडा काढतो, कसा? तू कुठच्या धाडसानं काढतोयस? माझ्याकडेसुद्धा माणसं पाठवू नका, मंत्र्यांनी कुठेही जायचं नाही, आता महाराष्ट्रात तडमडा, इकडची कामं करा. इतल्या माणसांना सुखी करा. त्यांची अडकलेली कामं पूर्ण करा, हाती घ्या..(टाळ्या) जो तो साला जर्मनीला रवाना! काय करणार तर आम्ही उद्योग पाहणार आणि तो महाराष्ट्रात आणणार! आतापर्यत किती आणलेत? मंत्र्यांचे दौरे रद्द. यापुढे मंत्र्यांचे दौरे सहन केले जाणार नाहीत! हे धोरण म्हणून पहिल्यांदा अमलात आणा! नंतर तो एक प्रश्न निघाला तो चाळकऱ्यांचा, वीज तोडू, पाणी तोडू. नाही तोडू देणार. बिलकुल तोडू देणार नाही. ही सरकारी भाषा नव्हे ही शिवशाहीमध्ये कोणी वापरता कामा नये. तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा म्हाडात बसले असतील नाही तर गाडात बसले असतील. कोणाचंही पाणी तोडलं जाता कामा नये, कोणाचीही वीज तोडली जाता कामा नये! माणसं जिंकायची असतात. शासन म्हणजे काय तुम्ही दिलेलं, निवडून दिलेलं तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच! आणि निवडून आल्यानंतर ही भाषा करायची बिलकुल सहन केली जाणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन सांगा असं असं आहे, ही योजना आहे, ही योजना तुमच्या हिताची आहे. आणि भाडेकरूंनीसुद्धा बघितलं पाहिजे किती आपल्या हिताचं आहे आणि किती नाही. जरा काही चार-पाच रुपये वाढले की लगेच बोंबाबोंब. ही भाडेवाढ आम्ही सहन करणार नाही. मग कोणाचे वाढले. ही महागाई कोणाला आहे सांगा. महागाईचा अर्थ काय? तुमची महागाई वाढते त्यानुसार तुमची अलाऊन्स, तुमचे बोनस…. एकंदर इंक्रीमेंट्स…. माझ्याकडे एक व्यक्ती होती, अशिक्षित नॉनमॅट्रिक आणि नॉनमॅट्रिक असून सुद्धा त्या माणसाला बोनस मिळायचा ३५ हजार. पगार साडेदहा हजार. नॉनमॅट्रिकला साडेदहा हजार, पोलिसांनाही नसेल इतका. आणि जो तो बाजारात गेला की टोमॅटो किती महाग आहे. आहेत ना महाग, अरे तुला कसले महाग, लेका तुझे गाल टोमॅटोसारखे झालेत! कशाला आपला हात घेऊन येतोस? टोमॅटो महाग. नको खाऊस, कांदे महाग. माझ्या शिवसैनिकांनी एक काम चालू केलं आहे, आमच्या एका नगरसेविकेनेसुद्धा एक चांगलं काम केलेलं आहे. शिव अन्न म्हणून आम्ही एक संस्था काढलेली आहे. त्यामध्ये उद्धव आणि कोकणे आहेत. अरे करा ना काहीतरी गरिबाला काही चांगलं द्या. आणि म्हणून ही योजना काढून आज ती माझ्या शिवसैनिकाने सुरू केलेली आहे. २० रुपये किलो कांदा. अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. चाळकरी, फेरीवाले…! एन्काऊंटर्स करावेच लागतील. अजिबात दया माया क्षमा काहीही नाही! दुसऱ्यांच्या मुळावर येणारी ही औलाद ज्या वेळेला त्यांच्या घरातल्यांचा घास तुम्ही मारता त्या वेळेला त्यांच्या कुटुंबियांचं काय होत असेल याची पर्वा तरी करता? कोण हे भिकार, च्यायला हे मानवी हक्कवाले. यांच्याच एकदा सगळ्या त्या स्टेनगनमधल्या गोळ्या घातल्या पाहिजेत. कुठूनही घाला! तुम्ही गुंडांची बाजू घेता. ज्यांनी इतरांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांच्याबद्दल काय? त्यांचा विचार का करीत नाही? तू त्यांच्या घरी गेला होतास? त्यांच्या बायकोचे अश्रू पुसलेस? त्यांच्या मुला-बाळांचं बघितलंस? कोणाची बाजू घेताय तुम्ही? काय म्हणून घेताय? आणि न्यायमूर्ती.. अहवाल का असेना. अहवाल आहे तो. इटस् नॉट अ जजमेंट. कोण बसले होते अय्यंगार आणि दिला त्याने ठोकून की या चकमकी खोट्या आहेत. मग खऱ्या कोणत्या आहेत, खरी आहे हे ठरवायला कोण? येताहेत का रस्त्यावर न्यायमूर्ती? पोलिसांनी त्यांना सांगायचं चला आमच्याबरोबर राहा आणि घडली एखादी चकमक तर बघू…. बरं पोलीस मेले की चकमक खरी आणि गुंड मेला की चकमक खोटी! ही व्याख्या करणार आहात तुम्ही? इथे खऱ्याखोट्याचा प्रश्न नाहीये. अशी अवलाद ती चिरडली गेलीच पाहिजे. तिथल्या तिथे मारली गेलीच पाहिजे. केव्हा काय याची शहानिशा कोर्टाने करावी. कारण तेवढा त्यांना वेळ असतो. पण ही माणसं तर कशी न्याय देतात, कसा अहवाल सादर करतात तसाच तो श्रीकृष्ण अहवाल. याच पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे मी बोललो जे, आजही बोलतो, की श्रीकृष्ण अहवाल हा आकसाने लिहिला गेलेला आहे. आकस आहे. याचं कारण असं होतं की, आमचं सरकार आलं मनोहर जोशी ज्या वेळेला मला म्हणाले की, आयोगावर किती खर्च करायचा. म्हटलं का? तर म्हणे आतापर्यंत एक-दोन कोटी तर झाले अजून किती खर्च करायचा. म्हटलं हे कोटी लोकांच्या उपयोगी पडतील. संडास देता येईल वाटेल ते करता येईल. मग म्हणे काय करावं बाजूला करा, रद्द करा. सहा महिने, सहा महिने, सहा महिने, जे चाललंय आपलं चालतंय मारुतीची शेपटी वाढतेय. रद्द करा रद्द केला. बिचाऱ्या आमच्या वाजपेयीचं १३ दिवसांचं सरकार आलं, त्याला तिथे कोणी सांगितलं अहो तिथे हंगामा होण्याची शक्यता आहे ते तुम्ही करून टाका, भानगड नको! मुसलमानांची बाजू घेणारे भरपूर आहेत तिकडे. इथे मुंबईत सुद्धा आहेत. आणि अशा तऱ्हेने आम्हाला सांगितलं की, आम्ही म्हटलं जाऊ द्या बसून टाका. मग आम्ही बसवलं आणि त्यांनी सूड काढला. साहजिक आहे. व्यक्ती कितीही मोठी असली तर ती म्हणेल साल्यांनो, आम्हाला काढून टाकलंत ना आम्ही बघू आणि त्यांनी बघितलं. आणि म्हणून राग ठेवला. हा श्रीकृष्ण आयोग यामध्ये एकही बदल करायला आम्ही तयार नाही. आणखी भरपूर आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, मनोहरपंत शेतकऱ्यांच्या विजेचा तुम्हाला विचार करावा लागेल. विजेचे दर तर अजिबात वाढता कामा नये, मनोहरपंत जर वेळ आली तर माफ करून टाका. पंजाब आणि इतरही राज्यात शेतीसाठी वीज मोफत दिली जाते. महाराष्ट्रात ती कमी दराने दिली जाते. महाराष्ट्रात बळी राजाला याविषयी समाधान देऊ, या शेतीसाठी वीज मोफत देऊया, काय करायचं आहे ते करू या. वाटल्यास ऊस मळेवाल्यांना नका देऊ, निदान गरीब शेतकऱ्यांना द्या. ते काँग्रेसवाले आहेत ना ‘ठोले’ साले आयुष्यभर साले उसाचे दांडके घालून फिरताहेत ताठ मानेवर. ती माणसं. जर जमलं तर मला वाटतं या शेतकऱ्यांना वाचवा हा शेतकरी आपला प्राण आहे. जय जवान जय किसान, लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला हा नारा आहे. जय जवान राहू द्या जाताहेत महाराष्ट्रातली माणसं जाताहेत. पण तरीही जय किसान हा नारा जिवंत राहू द्या. आणि वीज माफ करा, झाली तर उत्तमच, मात्र त्यांना छळू नका. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल मुलांच्या शिक्षणात वाढ करा. वाढती महागाई लक्षात घेता शिष्यवृत्तीत वाढ झालीच पाहिजे. या शिष्यवृत्तीत वाढीचा लाभ मागासवर्गीय आर्थिक दुर्बल मुलांना मिळालाच पाहिजे. नाहीतर भलतीच मुले घुसतात आणि आर्थिक लाभ घेतात. तेवढं जरा काटेकोरपणानं पाहिलं पाहिजे आणि मग आमच्या नामदेव ढसाळांसाठी.. दलित वर्गासाठी दक्षता समित्यांची तरतूद आहे, पण सध्या समित्या अस्तित्वात नाहीत. दलित-सवर्ण हे वाद गैरसमजातून होतात! दक्षता समित्यांनी हा वाद जागीच कमी होईल. आणि एक अति महत्त्वाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लोकमान्य टिळक आहेत आमचे, एवढी थोर माणसं कोर्टात आहेत, मंत्रालयात आहेत, इतर ठिकाणी आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि एक मात्र असा फार मोठा महान असा माणूस आहे माझे वडील त्यांना गुरुस्थानी मानत होते. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आहेत. त्यांची तसवीर तुम्ही सर्वत्र लावा, मंत्रालयात लावा, कोर्टात लावा सगळीकडे लावा, इतरत्र लावा, कॉलेजेसमध्ये लावा. लोकांना कळू द्या. या माणसाने काय बंद केलं ते. अहो एवढी माणसं विसरायची, मग कॅलेंडरवर येणार कोण ममता कुलकर्णी? एक बॅनर्जी आहे तेवढी बस झाली. या तरुणांपुढे कोणता तरी आदर्श येऊ द्या. यांच्यापुढे कोणीतरी दिसू द्या की हे कोण होते आणि अशा तऱ्हेने सुधारणा महाराष्ट्रात घडवायची आहे आपल्याला.
आज भगवा सप्ताह काय करावा, कसा करावा याची पुस्तिका आम्ही केली आहे. पत्रकारांनाही देणार आहोत. काही कमी झालेली नाहीये. झालेल्या प्रचाराला घाबरू नका. प्रामाणिकपणे आपण सेवा करीत आहोत. १९९२ साली सुद्धा सत्ता आली होती, हरामखोरांनी फोडली. या गधड्यांना मंत्री पदावर बसताना जात आठवत नाही. मी आगरी समाजाचा, मराठा समाजाचा, पाच कळशी, मी दोन कळशी, मी दीड कळशी.. घागरीला भोक असलं तरी चालेलपण मी दहा कळशी….प्रश्न असा आहे की आम्हीही काही केलेलं नाही. मी आगरी बघितला नाही, मराठा बघितला नाही. माझ्याकडे जात नाही. फक्त आम्ही सगळे मराठी बांधव आहोत. मराठी मायबोलीची आम्ही लेकरं आहोत. महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत, पाईक आहोत, शिवरायांचे मावळे आहोत ही भूमिका आमची आहे. पण ज्या वेळेला त्यांची मंत्रीपद जातात त्या वेळेला त्यांचा आगरी समाज आठवतो, मराठा समाज आठवतो. मराठा समाज आठवणाऱ्या माणसांना मला विचारायचं आहे की, शरद पवारानं ज्या वेळेस वसंतदादाच्या पाठीत वार केला त्या वेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय? मराठा मराठ्यांच्या पाठीत वार करू शकतो. पण हरामखोरी केली तर एखाद्या मराठ्याला… तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापलं ना महाराजांनी. महाराजांच्या विरोधात जे उभे राहिले… मुसलमान महाग पडले नाहीत महाराजांना. महाराजांना महाग पडले २०० मराठी. त्यांची यादी त्या पुसतकात आहे. मी तुम्हाला देईन एक दिवशी छापून सामन्यामध्ये. २०० मराठी महाराजांच्या विरोधात लढले आणि तो ताप होऊन बसला. जिजामाता ज्या वेळेला बघतेय की माझ्या भावावर वार होतोय. वार होत असताना सुलतान वरती बसून हसतो. गालातल्या गालात की हे मरगठे मरगठेच लढताहेत आपपासात. वार होताहेत. रक्ताच्या चिरकांड्या उडताहेत. हे सगळं पाहिल्यावर जिजामातेने हंबरडा फोडला. कोणी नाही. ना हिंदू वाचवायला कोणी, ना देवळं वाचवायला, कोणी नाही, ना देव वाचवायला, कोणी नाही.. कोणी नाही… पैठणचा तो एकनाथ उभा राहिला आणि त्याने आरोळी फोडली की, दार उघड बये दार उघड…(टाळ्या) आणि मग बयेने दार उघडलं. महाराजांचा जन्म झाला. आणि मग महाराज काय निघाले हे त्या लालूला काय माहिती, हे त्या मौलवीना सांगा, मुसलमानांना सांगा हा महाराष्ट्र तुमचा आहे. आज एकच निर्णय घेऊन उठायचं आपल्याला. एकच निर्णय. की कोणत्याही परिस्थितीत कसलीही टीका झाली, काहीही वर्तमानपत्र बोलत असली आणि कुणीही काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग हा जराही फिका पडू देणार नाही. मग निर्णय घ्यायचा की नाही? हो म्हणा म्हणजे मग निर्णय देतो. आजपासून एकच निर्णय यापुढे आपण एक कडवट शिवसैनिक म्हणून वागायचं आहे. शिवरायांचे सच्चे पाईक. शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक, भगव्या झेंड्याचे पाईक आणि टीका कशीही हो, काहीही हो, कशीही असली तरी कुठेही चलबिचल होऊ द्यायची नाही. मी महाराष्ट्रात जातोय. चार सभा माझ्या होणार आहेत. या चार सभांमध्ये मी माझे विचार मांडणारच आहे. भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं सगळी मंडळी जाताहेत, एक मोहोळ उठवून द्यायचाय आपल्याला एक मोहोळ! आणि काही झालं तरी, मात्र काही झालं तरी २००० सालानंतर तुमच्या तेजावरती त्या मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकलेलाच पाहिजे, अशी शपथ घेऊन आपण उठायचं आहे!
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
(सौजन्य - http://shivsena.org/m/)