Join us

अधिकारीपदी निवड झाली, पण २२ जणांना पत्रच नाही; ५ महिन्यांपासून नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 08:10 IST

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील समाजकल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील २२ पदांसाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजकल्याण अधिकारी, गट-ब या पदासाठी निवड झालेल्या २२ उमेदवारांना अद्यापही शासनाकडून नियुक्तिपत्र मिळालेले नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये निकाल जाहीर होऊनही ५ महिन्यांपासून या उमेदवारांना नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील समाजकल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील २२ पदांसाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेची लेखी परीक्षा १८ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली, तर मुलाखती फेब्रुवारी २०२५ मध्ये पार पडल्या. परीक्षेचा अंतिम निकाल ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर निवड झालेल्या २२ उमेदवारांची शिफारस पत्र १७ मार्च २०२५ रोजी प्राप्त होऊन मंत्रालयात ७ एप्रिल २०२५ रोजी कागदपत्र पडताळणीही पूर्ण झाली आहे.

२ वर्षे उलटली, सर्व टप्पेही यशस्वीरीत्या पार पडले

जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटल्याने आणि सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार पडल्यानंतरही नियुक्ती रखडल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. यातील अनेक उमेदवार बेरोजगार आहेत तर काहीनी इतर संधी सोडून या पदासाठी तयारी केली होती. त्यांना आता आर्थिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.