‘स्पेशल२६’ पाहून काकाला गंडा

By Admin | Updated: June 16, 2015 01:40 IST2015-06-16T01:40:32+5:302015-06-16T01:40:32+5:30

एका इसमाने ‘स्पेशल २६’ हा हिंदी चित्रपट पाहून स्वत:च्याच काकाला लुबाडल्याची घटना चारकोप परिसरात घडली. मात्र चारकोप पोलिसांनी

See 'Special 26' | ‘स्पेशल२६’ पाहून काकाला गंडा

‘स्पेशल२६’ पाहून काकाला गंडा

मुंबई : एका इसमाने ‘स्पेशल २६’ हा हिंदी चित्रपट पाहून स्वत:च्याच काकाला लुबाडल्याची घटना चारकोप परिसरात घडली. मात्र चारकोप पोलिसांनी तातडीने तपास करत हा आरोपीला गजाआड केले. या प्रकरणी आठ लोकांना अटक करत चोरीला गेलेली ८० टक्के मालमत्ता देखील हस्तगत करण्यात आली आहे. या कामगिरीसाठी तपास पथकाला बक्षीस देखील देण्यात आले.
जयंतीभाई सरवय्या या चारकोप मध्ये राहणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरी २ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास चार लोक हे इन्कम टॅक्स अधिकारी बनून आले. हातोडीच्या सहाय्याने सरवय्या यांच्या घरातील कपाटातून दोन बॅग्स त्यांनी ताब्यात घेतल्या. निघताना त्यांनी सरवय्या यांनाही सोबत घेतले आणि सर्व पांढऱ्या रंगाच्या झायालो गाडीत निघाले. ही गाडी त्यांनी एका टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतली होती. गाडीच्या मालकाला या सगळ््या प्रकाराची काहीही माहिती नव्हती. जोगेश्वरीला पोहोचताच, या लोकांनी सरवय्या यांना गाडीमधून खाली उतरविले आणि सायंकाळी चार वाजता वरळी कार्यालयात या असे सांगून ते पसार झाले. घरी परतल्यानंतर सरवय्या याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि त्यांनी संबंधित बॅगचे खरे मालक बिल्डर रामजी शहा यांना माहिती दिली. त्यांनी याप्रकरणी चारकोप पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली. सुरुवातील पोलिसांना सरवय्या आणि रामजी यांच्यावर संशय होता. तपासाअंती सरवय्या यांचा शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेला पुतण्या जगदीश मेवाडला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीनंतर त्यानेच काही साथीदारांसोबत हा बनाव रचल्याचे उघड झाले.
त्यानुसार पोलिसांनी परेश गोस्वामी, जगदीश मेवाडा, भारत सिसालिया, महेश वेगळा, कादर शेख, पंकज चव्हाण, बाळकृष्ण ऊर्फ बाळा आर्सन आणि युनिस शेख यांना अटक केली. अटक आरोपींपैकी शेख, आर्सन, चव्हाण आणि आणखी एका फरार आरोपीने मिळून सरवय्या यांच्या घरी चोरी केली होती. तर उर्वरित रेकी करण्यात सामील होते. फरार आरोपी देखील सरवय्या यांच्या नात्यातील असल्याचे या विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फतेहसिंग पाटील यांनी सांगितले. हा सर्व प्रकार त्यांनी ‘स्पेशल २६’ चित्रपट पाहून केले. त्यांच्याकडून १ कोटी २१ लाख ६३ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. सर्वांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या सर्व तपासाचे श्रेय सहाय्यक पोलिस निरीक्षक रावराणे आणि महेश कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाला देत त्यांचे अभिनंदनही पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: See 'Special 26'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.