Join us  

आता तरी डोळे उघडा; 'हे' पाहा मुंबईतील धोकादायक पूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 5:17 PM

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेत 23 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांच्या डागडुजीची चर्चा तर प्रचंड झाली. मात्र, तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, अशाच काहीशा अवस्थेत प्रशासन असतं अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जातेय.

मुंबई -  एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेत 23 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांच्या डागडुजीची चर्चा तर प्रचंड झाली. मात्र, तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, अशाच काहीशा अवस्थेत प्रशासन असतं अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जातेय. मंगळवारी झालेल्या अंधेरी पूल दुर्घटनेमुळे संतप्त मुंबईकर पुन्हा एकदा प्रशासनाच्या नावानं शंख करत आहेत. मोटरमननं प्रसंगावधान दाखवल्यानं सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र प्रशासन मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. 

अंधेरी पूल दुर्घटनेच्या निमित्तानं रेल्वे स्थानकांवरील पुलांच्या अवस्थेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील पाच पूल धोकादायक अवस्थेत असल्याचं अनेकदा समोर आलंय. पण त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. 

मुंबईतील धोकादायक पूल

1. कर्णाक पूलःमुंबईतील रेल्वेमार्गावरील सर्वात जुन्या पुलांच्या यादीमध्ये कर्नाक पुलाचाही समावेश आहे. सध्या यावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रेल्वे आणि पालिका त्यांच्या हद्दीतील कर्णाक पुलाचे तोडकाम करणार आहे. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेने ६५ कोटींची तरतूद केली आहे. एप्रिल २०१९ मध्ये या पुलाचे काम करायचे आहे; मात्र अडथळे दूर झाल्याशिवाय पूल पाडणे तसेच पुनर्बांधणी करण्याच्या कामाला सुरुवात करता येत नसल्याची खंत पालिकेच्या रस्ते अभियंता खात्याच्या अधिकाऱ्यांनी  व्यक्‍त केली.

2. परळ-एल्फिन्स्टन पूलः1931 मध्ये बांधलेला हा पूल मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वे मार्गांना जोडतो. या पुलावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. शिवाय, वाहतुकीसाठीही हा पूल वापरला जातो. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

3. लोकमान्य टिळक पूलःदादरमधील टिळक पुलाची डागडुजी होणे गरजेचं आहे. 1925 साली हा पूल बांधण्यात आला होता. 

4. करी रोड स्टेशन पूलः1912 मध्ये करी रोड रेल्वे स्थानकावरील पूल बांधण्यात आला. मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी त्याचा काही भाग पाडून नव्याने बांधण्यात आला आहे. आज या पुलावरून वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. 

5. चर्नी रोड स्थानकावरील पूलःऑक्टोबर 2017 मध्ये  चर्नीरोड स्टेशनजवळ असलेल्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला होता. या घटनेत दोन जण जखमी झाले होते.  यानंतर या धोकादायक पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले.

टॅग्स :अंधेरी पूल दुर्घटनामुंबईबातम्या