औद्योगिक कामगारांची सुरक्षितता धोक्यात!
By Admin | Updated: October 9, 2014 23:15 IST2014-10-09T23:15:54+5:302014-10-09T23:15:54+5:30
त्यामुळे पुन्हा एकदा तारापुर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षितते बाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

औद्योगिक कामगारांची सुरक्षितता धोक्यात!
पंकज राऊत, बोईसर
तारापुर एम.आय.डी. सी. मधील जेपीएन फार्मा प्रा. लि. या कारखान्यात बुधवारी रिअॅक्टर मधील तापमान वाढुन झालेल्या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे पुन्हा एकदा तारापुर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार व अधिकाऱ्यांच्या सुरक्षितते बाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता पर्यंत अशा अनेक घटना घडल्या यामध्ये अनेक कामगारांचे बळी जाऊनही खंबीर उपाययोजना राबविली जात नसल्याने कामगार वर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
जेपीएन फार्मा मधील रिअॅक्टरचे आतील दाब वाढून रिअॅक्टरचे झाकण उडुन जवळच असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर तसेच अंगावर जोरदार आपटून शरीराचा काही भाग छिन्न विछिन्न झाला काही क्षणात घडलेल्या घटनेमुळे त्या निष्पाप कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.तारापुर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्फोट, आग आणि अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये निष्पाप कामगारांच्या बळीची संख्या अधिक असल्याने आणि त्यामध्ये बहुसंख्य कंत्राटी कामगार असल्याने त्यांचा कुणीही वाली नसून त्या कामगारांचे कुटूंब रस्त्यावर येत आहे. तर काही कामगारांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यामुळे त्यांना जीवनाशी संघर्ष करावा लागत आहे. आता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे चौकशांच्या फेऱ्या सुरू होणार असल्याची र्चचा होत आहे.