महापालिकेची रखडलेली सुरक्षा रक्षक भरती सोमवारपासून
By Admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T22:48:35+5:30
लोकसभेची आचारसंहितेमुळे रखडलेली सुरक्षा रक्षकांची भरती येत्या १२ मे पासून पुन्हा सुरु होणार असल्याने यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

महापालिकेची रखडलेली सुरक्षा रक्षक भरती सोमवारपासून
ठाणे- लोकसभेची आचारसंहितेमुळे रखडलेली सुरक्षा रक्षकांची भरती येत्या १२ मे पासून पुन्हा सुरु होणार असल्याने यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. सात दिवसात १३ हजार २० उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. परंतु, यापूर्वी झालेल्या भरतीच्या वेळेस पालिकेला एक दिवसात एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. असे असतांना आता एका - एका दिवसात पालिका दोन हजाराहून अधिक उमेदवारांची मैदानी चाचणी घेणार आहे.
ठाणे महापालिकेने ३८५ सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरु केली होती. या भरतीसाठी तब्बल ७० हजाराहून अधिक अर्ज आले होते. त्यातून छाननी करुन उमेदवारांच्या प्रवर्गानुसार भरतीला सुरवात केली होती. परंतु पहिल्या तीन दिवसात क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार उपस्थित राहिल्याने पालिकेने ही भरतीच बंद केली. त्यानंतर ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरवात केली. आलेल्या ऑनलाईन अर्जांची छाननी केल्यानंतर टोकन दिलेल्या उमेदवारांना सुरूवातीला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर ऑनलाईन अर्ज आलेल्यांची मैदानी चाचणी घेतली जाणार होती. परंतु लोकसभेची आचारसंहिता लागल्याचे कारण देऊन, महापालिकेने ती लांबविली होती. परंतु आता येत्या १२ ते २० मे या कालावधीत, ही भरती केली जाणार आहे. यामध्ये १२ तारखेला अनु.जमाती मधील २०८३, १३ तारखेला अनु. जातीमधील २२८२, १४ मे रोजी इतर मागास वर्गातील २३६१, १६ आणि १७ तारखेला खुल्या वर्गातील ४११६ आणि १९ व २० तारखेला सर्व प्रवर्गातील ४२३६ उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये १६ आणि १९ तारखेला पुरुष उमेदवारांना पाचारण केले जाणार आहे. परंतु मागील वेळेचा अनुभव गाठीशी असतांना सुध्दा महापालिकेने एका दिवशी दोन हजाराहून अधिक उमेदवारांना एकाच दिवशी पाचारण करण्याचे निश्चित केल्याने त्यांना ही प्रक्रिया योग्य रितीने घेता येईल का? या बाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
या भरतीसाठी १५ महिला आणि २२ पुरुष सुरक्षा रक्षक अधिकार्यांसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रक्रियेचे व्हीडीओ शुटींग केले जाणार असल्याची माहिती सुरक्षा रक्षक विभागाचे प्रमुख शुक्राम जाधव यांनी दिली.