Join us  

पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्राला मिळणार सुरक्षा कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 2:23 AM

वन विभागाचा पुढाकार : तारेचे कुंपण घालणार, प्रवेशबंदी

सागर नेवरेकर मुंबई : पश्चिम उपनगरातील काही भागांमध्ये कांदळवन वनविभागाच्या पुढाकाराने कांदळवन क्षेत्राच्या सीमेवर संरक्षक भिंत बांधून त्यावर तारेचे कुंपण उभारण्याचे काम पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आले आहे.

पश्चिम मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी या संदर्भात सांगितले की, कांदिवली येथील चारकोप, मालवणी अंबोजवाडी, मालवणी चिकूवाडी, येरंगळ धारवली रस्ता, एक्सर अशा अतिसंवेदनशील कांदळवन क्षेत्रात संरक्षक भिंती बांधून त्यावर तारेचे कुंपण लावण्याचे काम वनविभागाकडून सुरू करण्यात आले आहे. संरक्षक भिंतीचे काम इलिव्हेटर स्ट्रक्चरप्रमाणे असून बांधकामाच्या खालून पाणी जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गरजेनुसार संरक्षक भिंतीची उंची ठेवली जाणार आहे. भिंतीच्या वरच्या बाजूवर सात मीटर लांबीची काटेरी तार लावण्यात येणार आहे.

संरक्षक भिंतीचे बांधकाम झाल्यावर कांदळवनात कोणीही प्रवेश करू शकणार नाही़ कांदळवनाच्या आतील भागामध्ये कांदळवन विभागाच्या वनअधिकाऱ्यांची गस्त सुरू राहील. एक मीटर संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा खर्च अंदाजे १३ ते १४ हजार रुपये आहे.पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी म्हणाल्या की, कांदळवन विभागात दिवसेंदिवस अनेक गैरप्रकार वाढू लागले आहेत. कांदळवनाला सुरक्षा भिंत नसल्यामुळे कोणीही सहजरीत्या आतमध्ये प्रवेश करतो. कांदळवन क्षेत्रात कचºयाचे साम्राज्य वाढू लागले आहे़ आगीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जास्त उंचीच्या भिंती बांधूनही काही उपयोग होणार नाही.

कारण आतमध्ये काय सुरू आहे हे कळणार नाही. त्यामुळे तीन ते पाच फुटांपर्यंत भिंत बांधून त्यावर तारेचे कुंपण तयार करावे, असे कांदळवन विभागाला सांगण्यात आले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या गदारोळामध्ये संरक्षक भिंतीचे काम रखडले होते. आता कामाला गती मिळाली आहे.पश्चिम विभागातील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमण बºयापैकी हटविण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी अतिक्रमण बाकी असून तेदेखील लगोलग काढून टाकले जाईल. अतिक्रमण उठविल्यावर पुन्हा काही दिवसांनी तेथे अतिक्रमण होते. पुन्हा-पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर कांदळवन क्षेत्राच्या सीमेवर संरक्षक भिंत आणि तारेचे कुंपण बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.- एन. वासुदेवन, प्रमुख, कांदळवन क्षेत्र (महाराष्ट्र राज्य)

टॅग्स :उच्च न्यायालयजंगल