मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांतील सुरक्षा वाढविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:52 IST2019-02-25T05:52:52+5:302019-02-25T05:52:55+5:30
रेल्वे बोर्डाची सूचना : गर्दीच्या वेळी प्रवाशांची अचानक तपासणी

मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांतील सुरक्षा वाढविली!
मुंबई : रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रत्येक स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला, कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेसच्या शौचालयातील स्फोट, कर्जत-आपटा एसटीत सापडलेला आयईडी बॉम्ब या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पोलीस ताफा वाढविण्यात आला आहे. ही वाढीव सुरक्षा दीर्घ कालावधीसाठी राहणार आहे.
मुख्यत: गर्दीच्या रेल्वे स्थानकांत सुरक्षा विभागाने बंदोबस्त वाढविला आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अचानक तपासणी सुरू केली आहे. श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, रेल्वे सुरक्षा दल पथक, रेल्वे पोलीस व इतर सुरक्षा विभाग अलर्ट राहून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत.
याबाबत आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील दोन दिवसांपासून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. प्रत्येक बाबीची तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे हद्दीत येणाºया प्रत्येक प्रवाशावर सुरक्षा विभागाची करडी नजर आहे. सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर, मेटल डिटेक्टर या यंत्रणा २४ तास सुरू आहेत. यांसह आरपीएफचे अधिकारी, श्वान पथक, साध्या वेशातील पोलीसही तैनात आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना, सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरपीएफकडून करण्यात आले आहे.
फेरीवाले, पॉलिशवाल्यांना हटवले
च्स्थानकावरील प्रवासी, टॅक्सी चालक, फेरीवाले, हमाल, बुट पॉलिश कामगार, दुकानदार व इतर सर्व नागरिकांवर लक्ष आहे. कोणताही संशयित प्रकार होत असल्यास तेथे तत्काळ रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचत आहेत.
च्अनधिकृतरीत्या स्थानकावर बसणारे फेरीवाले, हमाल यांना हटविण्यात येत आहे. गर्दुल्ले, भिकारी यांना रेल्वे स्थानकावरून सुरक्षेच्या कारणास्तव उठविण्यात येत असल्याचे आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
चोख बंदोबस्त
मध्य रेल्वे मार्गावर एकूण ३ हजार १४० सीसीटीव्ही कॅमेरे, ११ बॅग स्कॅनर, ५ विशेष सुरक्षा गाड्या, २९ श्वान पथके कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर १ हजार १२८ सीसीटीव्ही कॅमेरे, ६ विशेष सुरक्षा गाड्या, ५ बॅग स्कॅनर, १२ श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत.