सिडकोच्या शिबिरातून जीवनाचा मूलमंत्र
By Admin | Updated: June 22, 2015 02:26 IST2015-06-22T02:26:22+5:302015-06-22T02:26:22+5:30
वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६.३० पासून सुरू झालेल्या या योग शिबिरात नवी

सिडकोच्या शिबिरातून जीवनाचा मूलमंत्र
नवी मुंबई : वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६.३० पासून सुरू झालेल्या या योग शिबिरात नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे परिसरातील सर्वच वयोगटातील जवळपास पाच हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी या योग शिबिराचे उद्घाटन केले. शिबिरामध्ये नवी मुंबई शहरातील रोटरी क्लबचे सदस्य, सेंट झेवियर्स आणि एस. एस. शाळेतील विद्यार्थी तसेच गतिमंद विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय मधुमेहमुक्ती अभियान मधुमेहासारख्या गंभीर आजारावर योगसाधनेच्या माध्यमातून मात करता येते, हे नागरिकांना पटवून देण्यासाठी शहारात २१ जून ते २७ जून या कालावधीत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर सकाळी ६.३० ते ८ या वेळात बेलापूर येथील सेक्टर ८ परिसरातील रज्जू भवन, नेरूळ सेक्टर ८ परिसरातील झुलेलाल मंदिर, सानपाडा सेक्टर ८ केमिस्ट भवन, वाशी आर्य समाज मंदिर या सर्व ठिकाणी या मोफत कार्यशाळा होतील.
या शिबिराच्या प्रथम सत्रात द आर्ट आॅफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम यांची शास्त्रशुध्द पद्धतीने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये दैनंदिन जीवनात योगाचे फायदेही सांगण्यात आले. दुसऱ्या सत्रात १०८ सूर्यनमस्कार सादर करण्यात आले.
द आर्ट आॅफ लिव्हिंगच्या बालउपासकांच्या वतीने नृत्य सादर करण्यात आले. योग विद्या निकेतनचे संस्थापक पद्मश्री सदाशिव निंबाळकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत आदी उपस्थित होते.