अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST2020-12-05T04:10:27+5:302020-12-05T04:10:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई एसईबीसीच्या जागा वगळून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता ...

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
एसईबीसीच्या जागा वगळून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर १० सप्टेंबरला जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी आज तब्बल तीन महिन्यांनी जाहीर होणार असून या गुणवत्ता यादीत महाविद्यालयांचे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन अखेर एसईबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे एसईबीसीच्या उर्वरित रिक्त जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश मिळणार आहे. यामुळे साहजिकच शाखानिहाय महाविद्यालयांचे कट ऑफ पहिल्या गुणवत्ता यादीपेक्षा जास्त असणार आहेत.
मुंबई विभागात एसईबीसीअंतर्गत अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १७ हजार ८४४ जागा उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या फेरीसाठी केवळ २९२३ विद्यार्थ्यांनीच या जागांसाठी अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी २७८८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आले होते, त्यांचे प्रवेश कायम राखले जाणार असून उर्वरित जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना दिलासा
जरी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ एसईबीसीच्या जागांमुळे वाढणार असला तरी अनेक प्राचार्य आणि पालक यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त करत आहेत. खुल्या वर्गात आधीच राज्य शिक्षण मंडळ व इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये जागांसाठी खूप स्पर्धा असते, त्यात या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धेतून दिलासा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया ते देत आहेत.