Join us  

CoronaVirus News: मानवी चाचणीचा दुसरा टप्पा हाेणार सुरू; ४०४ जणांना डाेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 1:11 AM

मानवी चाचणीकरिता आरोग्यसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे.

मुंबई : जे. जे. रुग्णालयात या आठवड्यात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. जे.जे.मध्ये आतापर्यंत ४०४ जणांना, तर सायन रुग्णालयात १५१ जणांना डोस देण्यात आला आहे. लसीच्या दुसऱ्या डोसकरिता स्वयंसेवकांचे समुपदेशन करणे आव्हानात्मक असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

मुंबईत सायन आणि जे.जे. रुग्णालयात कोव्हॅक्सिन या मानवी लसीचा प्रयोग सुरू आहे. देशभरातील २५ वैद्यकीय संस्थांमध्ये सुमारे २६ स्वयंसेवकांना ही लस देण्यात येईल. दाेन्ही रुग्णालयांत मिळून जवळपास ५५५ स्वयंसेवकांनी सहभागासाठी नोंद केली आहे. सायन आणि जे.जे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीच्या पहिल्या डोसनंतर अत्यल्प प्रमाणात दुष्परिणाम दिसून आला.

लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या २ ते ३ स्वयंसेवकांना थोडासा ताप आल्याचे निदर्शनास आले. दोन्ही रुग्णालयांना प्रत्येकी हजार स्वयंसवेकांची गरज आहे. स्वयंसेवकांच्या सहभागासाठी स्थानिक नगरसेवकांचीही मदत घेतली जात आहे. दर दिवशी १५ ते २० स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात येत आहे. जे.जे.मध्ये मंगळवारी १६ स्वयंसेवकांना डोस देण्यात आला. तर नऊ स्वयंसेवक दुसऱ्यांदा लसीचा डोस घेण्यासाठी आले होते.

सहभागी स्वयंसेवकांपैकी ३० ते ४० टक्के महिला

डॉ. दिनेश धोंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मानवी चाचणीकरिता आरोग्यसेवा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. सध्या सहभागी झालेल्या स्वयंसेवकांपैकी ३० ते ४० टक्के महिला आहेत. तर ५ टक्के स्वयंसेवक ५० हून अधिक वयाचे आहेत.  स्वयंसेवकांच्या संमतीनंतर त्यांची रक्तदाब, मधुमेह आणि उच्चरक्तदाबाची चाचणी केली जाते. हे आजार नियंत्रणात असलेल्या स्वयंसेवकांना लसीकरणासाठी संमती दिली जाते.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस