सलग दुसऱ्या दिवशीही टॅक्सी संपामुळे हाल
By Admin | Updated: September 3, 2015 01:06 IST2015-09-03T01:06:03+5:302015-09-03T01:06:03+5:30
ओला, उबेर खासगी टॅक्सी सेवांना विरोध करत सलग दुसऱ्या दिवशीही स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून संप पुकारण्यात आला. त्यामुळे काही भागात संपाची झळ मुंबईकरांना पोहोचली.

सलग दुसऱ्या दिवशीही टॅक्सी संपामुळे हाल
मुंबई : ओला, उबेर खासगी टॅक्सी सेवांना विरोध करत सलग दुसऱ्या दिवशीही स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून संप पुकारण्यात आला. त्यामुळे काही भागात संपाची झळ मुंबईकरांना पोहोचली. मात्र हा संप पुढ सुरु ठेवायचा की नाही, यावर गुरुवारी चर्चा होणार असल्याचे युनियनकडून सांगण्यात आले.
ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवा मनमानी कारभार करत असून त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे अनधिकृतपणे धावणाऱ्या या सेवांवर बंदी आणावी अशी मागणी स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून उचलून धरण्यात आली आहे. या खाजगी टॅक्सींना विरोध करत मंगळवारी संप पुकारण्यात आला. बहुतांश भागात टॅक्सी बंद असल्याने मुंबईकरांना त्याचा फटका बसला. मात्र हा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिल्याने मुंबईकरांचे दुसऱ्या दिवशीही हाल झाले. मुंबई सेन्ट्रल, दादर पूर्व, एलफिस्टन, वरळी यासह काही भागांत टॅक्सी धावल्या नाहीत. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काही युनियनकडून मात्र टॅक्सी सुरु ठेवण्यात आल्याने दिलासा मिळत होता. मुंबईकरांना बसलेली झळ पाहता अन्य टॅक्सी युनियनकडून परिवहन मंत्र्याकडे कारवाईची मागणी केली आहे. याबाबत स्वाभिमान टॅक्सी युनियनचे मुंबई अध्यक्ष के.के.तिवारी यांना विचारले असता, गुरुवारी संप सुरु ठेवायचा कि नाही यावर बैठक होणार आहे. या बैठकीतच निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)