सीवूड्स परिसराची घुसमट
By Admin | Updated: November 21, 2014 01:21 IST2014-11-21T01:21:39+5:302014-11-21T01:21:39+5:30
रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे सीवूड्सवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरास प्रदूषणाचा विळखा पडला आ

सीवूड्स परिसराची घुसमट
नवी मुंबई : रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे सीवूड्सवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरास प्रदूषणाचा विळखा पडला आहे. रस्ते व पदपथांवर धुळीचे थर साचले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणतेही बांधकाम करताना त्याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी विकासकावर असते. मात्र हा नियम सीवूड्स स्थानकात धाब्यावर बसवण्यात आला आहे.
‘सिडको’च्या वतीने सीवूड्स रेल्वे स्टेशन इमारत व भव्य व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. एल. अँड टी. कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. बांधकाम करताना ठेकेदाराकडून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम साहित्य घेवून जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे. स्टेशनजवळील संजय जोशी चौकापासून नवीन उड्डाणपुलापर्यंत रोडच्या कडेला धुळीचे थर साचले आहेत. पदपथावरही मोठ्या प्रमाणात धूळ आहे. त्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होत आहे. रेल्वे स्टेशनमधून रोज किमान १० ते १५ हजार प्रवासी ये-जा करतात. त्या सर्वांना प्रदूषणाचा त्रास होऊ लागला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवासीही धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. गतवर्षी या परिसरामध्ये रस्त्यावरील धूळ उडू नये आणि ती साचून राहू नये म्हणून टँकरमधून रोज सकाळी व सायंकाळी पाणी मारले जात होते. ठेकेदाराच्या वतीने रोज रस्ता साफ केला जात होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर साफसफाई बंद करण्यात आली, ती पुन्हा सुरू झालीच नाही. या बांधकामावर ‘सिडको’चे नियंत्रण आहे. परंतु ‘सिडको’चे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. अद्याप प्रशासनाने नागरिकांच्या समस्या ऐकूनही घेतलेल्या नाहीत. महापालिका प्रशासनही या समस्येकडे दुर्लक्ष करू लागले आहे. अशीच स्थिती राहिली तर नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिका व सिडको प्रशासन ठेकेदारास पाठीशी घालत असल्याची टीका होऊ लागली आहे. अशीच स्थिती राहिली तर ठेकेदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.