Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना बसवले, पण विमानच उडेना; शिवदीप लांडेंनी शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 09:12 IST

स्पाईस जेटचे ‘एसजी- ९२३’ हे विमान मंगळवारी दुपारी २.५५ वाजता मुंबई-पाटणा मार्गावर नियोजित होते. कोरोनाकाळात तपासणी कालावधी वाढल्यामुळे प्रवाशांना काही तास आधी चेक इन करण्याची विनंती केली जात आहे

मुंबई : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून हवाई प्रवाशांना नवनव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी मुंबईहून पाटण्याला जाणाऱ्या प्रवाशांना विचित्र अनुभव आला. विमानात बसून एक तासाहून अधिक काळ उलटला तरी ते उड्डाण घेत नसल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले. पोलीस अधिकारी शिवदीप लांडेही या विमानातून प्रवास करीत होते. त्यांनी सोशल मीडियावर हा त्रासदायक अनुभव शेअर केला आहे.

स्पाईस जेटचे ‘एसजी- ९२३’ हे विमान मंगळवारी दुपारी २.५५ वाजता मुंबई-पाटणा मार्गावर नियोजित होते. कोरोनाकाळात तपासणी कालावधी वाढल्यामुळे प्रवाशांना काही तास आधी चेक इन करण्याची विनंती केली जात आहे. त्यानुसार प्रवाशांनी लवकर चेक इन करून विमानात प्रवेश केला. आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, ते दुपारी २.१० वाजता विमानात दाखल झाले. २.५५ ची वेळ टळली तरी विमान मार्गस्थ होईना. ३.२० झाले तरी हालचाल नाही. त्यानंतर ३.२९ ला प्रत्येक प्रवाशाच्या मोबाइलवर एसएमएस आला की, विमान ४.३० वाजता उड्डाण घेईल.

याबाबत काही प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर मॅनेजमेंटने विमान मार्गस्थ करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रवाशांना सूचनेशिवाय इतका दीर्घकाळ एका डब्यात कसे बंद ठेवले जाऊ शकते, असा सवाल लांडे यांनी केला. महाराष्ट्रात ५ वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर आलेले शिवदीप लांडे हे मंगळवारी पुन्हा बिहार पोलीस सेवेत रुजू होण्यासाठी रवाना झाले.

विमान कंपनीचे म्हणणे...विमानतळावरील गर्दीमुळे उड्डाणाला उशीर झाला. एसजी- ११५ (मुंबई-दरभंगा) विमानालाही गर्दीचा फटका बसला. सूर्यास्तानंतर लँडिंगची परवानगी नसल्याने हे विमान रद्द करावे लागले. त्यामुळे प्रवाशांना पाटणाला जाणाऱ्या विमानातून प्रवास करण्याचा पर्याय देण्यात आला. काहींनी तो निवडला. उर्वरित प्रवाशांचे समायोजन अन्य विमानात करण्यात आले, अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या