Join us

बालरक्षकांकडून ५०९ शाळाबाह्य मुलांचा शोध; मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 00:53 IST

सर्व शिक्षण अभियानांतर्गत राबविली मोहीम

मुंबई : कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागाकडून बालरक्षकांमार्फत शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत २०१९च्या सुरुवातीच्या सत्रातच मुंबई पूर्व, दक्षिण आणि उत्तर विभागातून ५०९ शाळाबाह्य मुलोंचा शोध घेण्यात आला आहे. या मुलांना बालरक्षकांकडून शाळेतही दाखल करण्यात आला असून, त्यांचा शिक्षण प्रवास सुुरू झाला आहे. मागील वर्षात मुंबईतील या तिन्ही विभागांनी मिळून वर्षभरात ८१७ शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात यश मिळविले होते.

सर्व शिक्षण अभियानांतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार दिला गेल्याने, शाळेपासून दुरावलेल्या शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली आहे. राज्यातील ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातही शिक्षण विभागाने बालरक्षकांची संकल्पना अमलात आणून मोहीम राबविली. यामध्ये जिल्ह्यातील शाळांमधील इच्छुक शिक्षकांना बालरक्षक म्हणून या अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. आपल्या शाळेच्या आसपासच्या परिसरात असलेल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेत, त्यांना शाळेत दाखल करण्याची जबाबदारी या बालरक्षकांवर असून, त्यासाठी त्यांना शासकीय स्तरावर सहकार्य केले जात आहे. यासाठी आतापर्यंत दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या मोहिमेच्या समन्वयक अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये या बालरक्षकांची बैठक घेत त्यांना कामाचे स्वरूप सांगण्यात आले.

या मुलांना वाचन-लेखन व गणितातील मूलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्यातच उपयोग करावा, यासाठी शिक्षकांनी त्यानुसार स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या प्रशिक्षणासाठी शाळांमध्ये यापूर्वी भाषा, गणित, विज्ञान शैक्षणिक साहित्य संघ व अन्य शैक्षणिक पूरक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचा विशेष प्रशिक्षणासाठी उपयोग करावा, तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी यापूर्वी विशेष प्रशिक्षणाकरिता शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्याचाही वापर अध्यापनात करावा. त्यानुसार, त्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल करून विशेष प्रशिक्षण द्यावे. या व्यतिरिक्त आपल्या जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाळाबाह्य मूल आढळून आल्यास त्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.३८३ शिक्षक झाले बालरक्षकराज्यातील ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी शहरातही शिक्षण विभागाने बालरक्षकांची संकल्पना अंमलात आणली. यामध्ये जिल्ह्यातील शाळांमधील इच्छुक शिक्षकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार, यंदा तब्बल ३८३ शिक्षक बालरक्षक म्हणून काम करत असून, या मोहिमेचा भाग म्हणून कार्यरत आहेत. यामध्ये प्रत्येक शाळेतील किमान एका शिक्षकाचा समावेश असेल, असा प्रयत्न आहे.शाळेत दाखल झालेली मुलेपश्चिम विभाग - १२२दक्षिण विभाग - १५४उत्तर विभाग - २३३एकूण - ५०९

टॅग्स :शाळा