दाऊद कनेक्शनचा शोध

By Admin | Updated: February 5, 2015 01:53 IST2015-02-05T01:53:38+5:302015-02-05T01:53:38+5:30

इक्बाल कासकरने मोठा भाऊ दाऊदच्या सांगण्यावरून रिअल इस्टेट एजंटकडे खंडणी मागितली व ती नाकारताच त्याला मारहाणही केली,

Search of Dawood Connection | दाऊद कनेक्शनचा शोध

दाऊद कनेक्शनचा शोध

मुंबई : इक्बाल कासकरने मोठा भाऊ दाऊदच्या सांगण्यावरून रिअल इस्टेट एजंटकडे खंडणी मागितली व ती नाकारताच त्याला मारहाणही केली, असा संशय जे़ज़े मार्ग पोलिसांना आहे. या प्रकरणी दाऊदचा सहभाग शोधण्यासाठी इक्बालकडे कसून चौकशी करावी लागेल, असे पोलिसांनी बुधवारी न्यायालयाला सांगितले. त्याला ६ फेब्रुवारीपर्यंत कोठडी ठोठावण्यात आली आहे.
इक्बाल व त्याचा साथीदार शब्बीर उस्मान शेख ऊर्फ शब्बू यांना बुधवारी शिवडी न्यायालयात महानगर दंडाधिकारी ए़ ए़ कुलकर्णी यांच्यासमोर कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले. डॉन दाऊद हा इक्बालचा मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्याच्याच सांगण्यावरून त्याने शेखला खंडणीसाठी मारहाण केल्याचा संशय आहे.
तिसरा फरार आरोपी शोधण्यासाठी इक्बालची चौकशी करावी लागेल, असा युक्तिवाद सरकारी वकिलाने न्यायालयात केला. त्याला इक्बालचे वकील अ‍ॅड. श्याम केसवानी यांनी विरोध केला़ केवळ दाऊदचा भाऊ असल्याने इक्बालला या प्रकरणात गोवण्यात आले आहे़. त्याच्या विरोधात कोणताच ठोस पुरावा पोलिसांकडे नाही़ त्यामुळे तत्काळ जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र ही मागणी न्या. कुलकर्णी यांनी धुडकावून लावत इक्बाल व शब्बू यांना दोन दिवसांची कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)

इक्बालच्या घरातले सीसीटीव्ही चित्रण जप्त
काल पंचनाम्यानंतर जे़जे़ मार्ग पोलिसांनी डांबरवाला इमारतीतील इक्बालच्या घरातील, इमारतीबाहेर लावलेल्या सीसीटीव्हींचे चित्रण ताब्यात घेतले.
या चित्रणावरून पुढील तपासात पोलिसांना बरीच मदत होईल. तसेच इक्बालचा मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केला असून, त्याचीही पडताळणी सुरू झाली आहे. गुन्ह्यात वापर झालेली मोटारसायकलही पोलिसांना मिळाली आहे.

१३० जानेवारीला तक्रारदार इस्टेट एजंटला एक निनावी फोन आला़ ‘आपसे मिलनेका हैं, आप बोहरी मोहल्ले में आ जाओ,’ असे शेख यांना सांगण्यात आले़ त्या वेळी तक्रारदार एजंट पूर्व उपनगरांत एका कामात व्यस्त होता. हातातले काम संपवून घरी आल्यानंतर तक्रारदाराने या मोबाइल क्रमांकावर फोन करून कोण बोलते आहे, अशी विचारणा केली. तेव्हा समोरून बोलणाऱ्याने ‘मी इक्बाल कासकर बोलतोय’ असे दरडावले.
२त्यानंतर तक्रारदार आपल्या घरी असताना आरोपी शब्बू व तिसरा अनोळखी आरोपी बाईकवरून आले. ‘इक्बाल भायने मिलने को बुलाया हैं,’ असे सांगितली. तक्रारदार गेल्या तीनेक वर्षांपासून इक्बालला ओळखत असल्याने तो या दोघांसोबत पाकमोडीया स्ट्रीटवरील डांबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर इक्बालच्या खोलीत गेला.
३सुरुवातीला इक्बालने तक्रारदाराकडे व्यवसायाबबात चौकशी केली़ ही बातचीत झाल्यावर इक्बालने तीन लाख रुपयांची मागणी केली़ तू इस्टेट एजंटचा धंदा करतोस, मी तुझ्याकडे आतापर्यंत पैसे मागितले नव्हते, असेही इक्बाल तक्रारदाराला बोलला़ तेव्हा मी का पैसे देऊ, असा प्रतिप्रश्न इक्बालला केला. तेव्हा इक्बाल भडकला आणि त्याने शेखच्या उजव्या कानशिलात भडकावली. त्याचवेळी शब्बूनेही त्याच्या डाव्या कानाखाली लगावली़ तर तिसऱ्या इसमाने शेखच्या डोक्यात मारले़ या तिघांनी मिळून तक्रारदाराला बेदम मारहाण केली़ मारहाणीनंतर इक्बालने तीन लाख रुपये एका आठवड्यात आणून दे, अशी धमकीही दिली.
४ इक्बालच्या तावडीतून सुटल्यानंतर तक्रारदार तेथून जे़ जे़ रुग्णालयात गेला. कानाला जबर जखम झाल्याने पुढील उपचारासाठी नायर रुग्णालयात गेला. हा मार इतका जबर होता की दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर तक्रारदाराने भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मात्र ही घटना जे़ जे़ मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण त्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले़ तेथे पुरवणी जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी इक्बाल व शब्बूला अटक केली़

इक्बालविरोधात कलमे वाढली;
१० वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा
तक्रारदाराचा पुरवणी जबाब नोंदवून घेतल्यानंतर जे़जे़ मार्ग पोलिसांनी इक्बालविरोधात जिवे मारण्याची धमकी, अवैधपणे ताब्यात ठेवणे ही कलमे वाढवली आहेत. इक्बालविरोधातील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
इक्बालविरोधात कलमे व शिक्षेची तरतूद
आयपीसी कलम ३८५ - खंडणीसाठी धमकावणे़ दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही़
कलम ३८७ - खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणे़ सात वर्षांपर्यंत शिक्षा व दंड
कलम ३२७ - एखाद्याला मालमत्ता देण्यासाठी धमकावणे अथवा बेकायदा कृत्य करण्यासाठी दबाव टाकणे़ यासाठी आरोपीला १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़
कलम ३४२ - बेकायदापणे ताब्यात ठेवणे़ एक वर्षांची शिक्षा किंवा एक हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा़
कलम ५०६(२) - गुन्हेगारी हेतू़ सात वर्षांपर्यंत शिक्षा
कलम ३२३ - हे शिक्षेचे कलम आहे़ कलम ३४ अंतर्गत गुन्हा करणाऱ्याला या कलमाअंतर्गत एक वर्षांची शिक्षा किंवा एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात़
कलम ३४ - विशिष्ट हेतूने एकत्रितपणे गुन्हा करणे

घरचा डबा नाही
इक्बालला घरचे जेवण व औषधे देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. केसवानी यांनी केली. तेव्हा न्या. कुलकर्णी यांनी इक्बालला औषधे पुरविण्यास मंजुरी दिली. मात्र घरचा डबा देण्यास नकार दिला.

 

Web Title: Search of Dawood Connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.